समीर वानखेडे यांची बदली अथवा त्यांच्याकडून कोणत्याही केसेसचा तपास काढून घेतलेला नाही, एनसीबीकडून स्पष्टीकरण


मुंबई – एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे नाव कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर प्रकाशझोतात आले. आर्यन खानला अटक केल्यानंतर अनेकांकडून समीर वानखेडे यांच्या कारवाईवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यांच्यावर अनेक आरोप झाले. त्यातच समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खानसह इतर सहा ड्रग्ज केसचा तपास काढून घेतल्याच्या बातम्या शुक्रवारी आल्या. आता एनसीबीकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. समीर वानखेडे यांची बदली अथवा त्यांच्याकडून कोणत्याही केसेसचा तपास काढून घेतलेला नाही, अशाप्रकारचे स्पष्टीकरण आले.

एनसीबीकडून शुक्रवारी रात्री उशीरा एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये समीर वानखेडे यांना पदावरुन हटवले नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबतचे परिपत्रक एनसीबीचे अधिकारी संजय कुमार सिंह यांनी काढले आहे. या परिपत्रकात ते म्हणतात, एनसीबी संचालकांच्या निर्देशानुसार एक एसआयटी कमिटी गठन केली आहे. जी मुंबई एनसीबीची सहा केसेस टेकओव्हर करेल. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लिंकचा यात चौकशी केली जाणार आहे. कोणत्याही अधिकाऱ्याला पोस्टवरुन हटवण्यात आलेले नाही. या ऑपरेशन ब्रांचला ते असिस्ट करत राहणार आहे. एनसीबी केंद्रीय पथक आहे, जो एकत्र मिळून देशभरातील केसेसचा तपास करते.

मुंबई एनसीबीचे समीर वानखडे हे विभागीय संचालक या पदावर होते आणि त्या पदावरच ते राहणार आहेत. पण ते आता आपला अहवाल दिल्ली एनसीबीच्या अधिकाऱ्यांसमोर सादर करणार आहेत. या सहा प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीचे अधिकारी संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली केला जाणार आहे. सहा प्रकरणात संजय सिंह यांना समीर वानखेडे मदत करत करणार आहेत. या सहा प्रकरणाव्यतिरिक्त आधीच्या प्रकरणांचा तपास समीर वानखेडे यांच्याकडेच असणार आहे. पण एखादी नवीन कारवाई करण्यासाठी आता त्यांना दिल्ली एनसीबीच्या अधिकाऱ्यांना कळवावे लागणार असून त्यांची परवानगी लागणार आहे. दरम्यान, आपल्याला या केसमधून हटवले गेले नसून आपणच याचा तपास दिल्ली एनसीबीच्या एसआयटीकडे देण्यात यावा, अशी रीट पीटिशन दाखल केली होती, असे समीर वानखेडे यांनी सांगितले आहे.