मुकेश अंबानी लंडनमध्ये स्थायिक होण्याबाबतचे वृत्त निराधार


मुंबई – लंडनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सर्वेसर्वा, उद्योजक मुकेश अंबानी यांनी आलिशान घर विकत घेतल्यानंतर आता ते तिथेच स्थायिक होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही माध्यमांनी याबाबतचे वृत्तही दिले आहे. या चर्चेवर आता रिलायन्स समूहाने मोठी माहिती दिली आहे. लंडनमध्ये मुकेश अंबानी स्थायिक होण्याबाबतचे वृत्त निराधार असल्याचे कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रसिद्ध केलेल्या निवेदनात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने म्हटले की, स्टोक पार्क लंडन येथे अंबानी कुटुंबीय स्थायिक होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष अथवा त्यांच्या कुटुंबियांची अशी कोणतीही योजना नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. लंडन अथवा जगातील इतर कोणत्याही ठिकाणी अंबानी कुटुंबीय स्थायिक होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

स्टोक पार्कमध्ये रिलायन्स उद्योग समूहाच्या RIIHL ने मालमत्ता खरेदी केली आहे. या पुरात्व मालमत्तेचा वापर हा गोल्फिंग आणि इतर क्रीडा प्रकार खेळण्यासाठी याचा वापर होणार आहे. त्यासाठी स्थानिक कायदे आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात येणार आहे. ही मालमत्ता वेगाने वाढत जाणाऱ्या ‘कन्ज्यूमर बिझनेस’ला लक्षात घेता खरेदी करण्यात आली आली आहे.