नवाब मलिकांनी बहुतेक मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे – चंद्रकांत पाटील


पुणे – आर्यन खान प्रकरणाचा तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकल्यानंतर शनिवारी सकाळी पुन्हा एकदा ट्विटरवरुन राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या प्रकरणी भाष्य केले आहे. आर्यन खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीच्या एसआयटीकडे शुक्रवारी संध्याकाळी उशिरा सोपवण्यात आल्यानंतर आज सकाळीच मलिक यांनी ट्विट करुन, समीर वानखेडेंच्या एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. पण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यामध्ये बोलताना मलिक यांच्या या ट्विटवरुन त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकल्याचा खोचक टोला लगावला आहे. एसआयटीची मागणी मंत्र्यानेच करणे हे थोडे विचित्र असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

आर्यन खानचे अपहरण आणि त्याच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी समीर दाऊद वानखेडेंची एसआयटी चौकशी केली जावी, अशी मागणी मी केली होती. आता केंद्र आणि राज्य अशा दोन एसआयटी स्थापन झाल्या आहेत. पाहुयात, यापैकी कोण समीर वानखेडे आणि त्यांच्या प्रायव्हेट आर्मीचे सत्य जगासमोर आणते ते, असं ट्वीट नवाब मलिक यांनी आज सकाळी पावणे आठच्या सुमारास केले आहे.

पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना याचसंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी, नवाब मलिकांनी बहुतेक मंत्रिमंडळामधून राजीनामा दिला आहे. जर तुम्ही मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री आहात, तर तुम्ही प्रसिद्धी माध्यमातून का मागणी करत, असल्याचे म्हणत मलिक यांना टोला लगावला. तुमच्या हातात संपूर्ण सरकार आहे. एक गृहमंत्री (अनिल देशमुख) जेलमध्ये गेले आहेत. दुसरे गृहमंत्री (दिलीप वळसे-पाटील) आजारी होते, ते काल बरे झाले आहेत. तुमच्याकडे सगळी सत्ता आहे. एसआयटी नेमा नाहीतर डबल एसआयटी नेमा. रोज सकाळी उठून ट्विट करा, प्रेस घ्या; म्हणजे मंत्रीमंडळातून तुम्हाला काढलेले दिसते. मंत्रीमंडळातून काढलेल्या माणसानेच मागणी करायची असते, असेही पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले.