अमली पदार्थच्या संदर्भातील कायद्यामध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत मोदी सरकार ; रामदास आठवलेंचा खुलासा


धुळे – ड्रग्स घेणाऱ्याला तुरुंगात टाकू नये, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले आहे. त्याचबरोबर ज्याप्रमाणे सिगारेट पिणाऱ्याला व दारू पिणाऱ्याला तुरुंगात आपण टाकत नाही, त्याप्रमाणेच ड्रग्स घेणाऱ्याला देखील तुरुंगात न टाकता त्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवावे, अशा पद्धतीचे वक्तव्य करीत ड्रग्स घेणाऱ्याच्या विरोधात सुरू असलेला कायदा बदलण्याच्या विचारात केंद्र सरकार असल्याचा खुलासा देखील या वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

आमच्या मंत्रालयाचे असे म्हणणे आहे की, दारु पिणाऱ्याला, सिगारेट पिणाऱ्याला, बिडी पिणाऱ्याला आपण तुरुंगात टाकत नाही. ड्रग्ज घेणाऱ्याला तुरुंगामध्ये न टाकता व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवले पाहिजे. व्यसनमुक्ती केंद्र आपल्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणून जो कायदा सध्या आहे, ज्यात ड्रग्ज घेतलेल्याला तुरुंगात टाकले जाते, त्या कायद्यामध्ये बदल करण्याचा विचार आमचं मंत्रालय करत आहे. लवकरच त्यासंबंधीचा कायदा जर झाला तर ड्रग्ज घेणाऱ्याला तुरुंगात न पाठवात व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्यात येईल, असे आठवले यांनी म्हटले आहे. दोंडाईचा वरवाडे नगर परिषद येथे विविध विकास कामांच्या लोकार्पणसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज धुळे दौऱ्यावर आहेत. यावेळी लोकार्पण सोहळ्यादरम्यान आठवले यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अमली पदार्थांसदर्भातील कायदा बदलण्याचा विचार सुरु असल्याबद्दल भाष्य केले.

गेल्या काही दिवसांपासून मंत्री नवाब मलिक यांच्याकडून ड्रग्स पार्टी प्रकरणातील मुख्य तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर होत असलेल्या व्यक्तिगत आरोपांचा देखील रामदास आठवले यांनी समाचार घेतला. यावेळी आठवले यांनी मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्ससंदर्भात आरोप करावेत, परंतु समीर वानखेडे यांच्यावर व्यक्तिगत आरोप करू नये असे म्हटले आहे. तसेच नवाब मलिक हे सामील असलेले सरकार हे ड्रग्जला पाठिंबा देणार सरकार आहे. राज्य सरकारकडून समीर वानखेडेंना, एनसीबीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील यावेळी आठवले यांनी केला आहे.

मला वाटते समीर वानखेडे हे दलित आहेत. त्यांनी ड्रग्जमुक्त मुंबईची मोहीम हाती घेतली आहे. त्याचसंदर्भात त्यांनी कारवाई केली. यात त्यांचा कोणताही व्यक्तिगत फायदा नाही. जे आरोप प्रत्यारोप सुरु आहेत, त्यातून समीर वानखेडेंना, एनसीबीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. भारत सरकार सांगते, असा काही विषय नाही. समीर वानखेडेला थोडी आम्ही सांगितले होते. पुराव्यांच्या आधारे क्रुझवर छापा टाकून १९ जणांना अटक केली. २२ दिवस जामीन मिळाला नाही म्हणजे एनसीबीकडे मोठे पुरावे होते, असा याचा अर्थ असल्याचे आठवले म्हणाले.