मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केला नव्या घरात गृहप्रवेश


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज भाऊबीजेच्या मुहूर्तावर आपल्या नव्या घरात प्रवेश केला आहे. नव्या घराच्या नामफलकाचे पूजन मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या नव्या घराचे नाव शिवतीर्थ असे असणार आहे. राज ठाकरे यांच्या नव्या शिवतीर्थ वास्तुच्या वरती भगवा झेंडा फडकावत ठाकरे कुटूंबियांनी गृहप्रवेश केला आहे. दादर येथील ‘कृष्णकुंज’ शेजारीच नवी पाच मजली इमारत बांधली आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी आज कुटुंबासह गृहप्रवेश केला.

कृष्णकुंज शेजारीच नवे घर राज ठाकरे आणि कृष्णकुंज हे समीकरणच वेगळे आहे. दादरमध्ये कृष्णकुंज म्हणजे राज ठाकरे यांचे घर डोळ्यासमोर उभे राहते. पण आता राज ठाकरेंची निवासस्थानाची ओळख आता बदलली आहे. कृष्णकुंज शेजारीच 5 मजली इमारत हेच राज ठाकरेंचे नवे घर आहे.

राज ठाकरे गेल्या अनेक वर्षांपासून कृष्णकुंज येथे वास्तव्यास आहेत. राज ठाकरे यांना भेटायचे झाल्यास सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते कृष्णकुंजवर भेटायला येतात. राज ठाकरेंचे नवे घर कृष्णकुंज शेजारीच 5 मजली घर असेल. घराच्या पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था केली आहे. तसेच याच इमारतीत कार्यालयही असतील. या इमारतीत पक्षाच्या बैठका, भेटीगाठी आयोजित करण्यात येतील. अन्य मजल्यांवर ठाकरे कुटुंबाची राहण्याची व्यवस्था केली आहे. राज ठाकरेंच्या या नव्या घरात भव्य ग्रंथालय देखील उभारण्यात आले आहे. या नव्या घराच्या इमारतीचे काम आता पूर्ण झाल्यामुळे आज राज ठाकरे कुटुंबियांनी या घरात प्रवेश केला आहे.