केजरीवाल सरकार आणखी सहा महिने देणार मोफत रेशन


नवी दिल्ली – आपली मोफत रेशन योजना आणखी सहा महिने वाढवत असल्याची घोषणा दिल्लीच्या केजरीवाल सरकारने केली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्ग मिळणाऱ्या रेशनचा कालावधी देखील आणखी सहा महिने वाढवला जावा.

३० नोव्हेंबरपर्यंत केंद्र सरकारची मोफत रेशन योजना बंद होऊ शकते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, महागाई बरीच वाढली आहे आणि कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउननंतर अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना आवाहन आहे की गरिबांसाठी मोफत रेशन देण्याच्या या योजनेला सहा महिने वाढवले जावे.

मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे निर्माण झालेले संकट दूर करण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची घोषणा करण्यात आली होती. सुरूवातीस ही योजना तीन महिन्यांसाठी होती. पण नंतर कालावधी वाढवला गेला. सध्या देशात ८० कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे.