गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत देशभरात मिळणारे मोफतच रेशन धान्य बंद


लखनौ – नोव्हेंबरनंतर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने (PMGKY) अंतर्गत गरीबांना मोफत रेशन मिळणे कठीण आहे. शुक्रवारी अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले की, सध्या या योजनेअंतर्गत गरिबांना नोव्हेंबरनंतरही रेशन देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. पण, मोदी सरकारची ही योजना आता बंद होत असली, तरी योगी सरकार ही योजना आणखी 4 महिने सुरूच ठेवणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भातील घोषणा अयोध्येत शरयू नदीकिनारी आयोजित रामकथा पार्कमध्ये केली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत शरयू नदीकिनारी आयोजित रामकथा पार्कमध्ये राज्यातील गरीब जनतेसाठी मोठी घोषणा केली. पंतप्रधान गरिब कल्याण योजनेंतर्गत देशातील जनतेला नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत धान्य देण्यात आले आहे. ही योजना आता केंद्र सरकारने बंद केली आहे. पण, योगी आदित्यनाथ यांनी मार्च महिन्यापर्यंत ही योजना सुरूच ठेवण्याचा निर्णय उत्तर प्रदेशमध्ये घेतला आहे. त्यामुळे, पुढील 4 महिने येथील सर्वसामान्य जनतेला मोफत रेशनचे धान्य मिळणार आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये डाळ, तेल आणि मीठ हेही वाढीव मिळणार आहे.

गरीब कुटुंबांना केंद्र सरकारकडून गेल्या वर्षी कोरोनाच्या काळापासून मोफत रेशन दिले जात आहे. यावर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना मार्च 2020 मध्ये सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला ही योजना एप्रिल ते जून 2020 पर्यंत होती. त्यानंतर ते नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली. पण, ही योजना आता गुंडाळण्यात येत आहे. शुक्रवारी अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले की, अर्थव्यवस्था आता सुधारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार करण्याची कोणतीही योजना नसल्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात ही योजना सुरूच राहणार असल्याची घोषणा केली.

छत्तीसगडमधील काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार पी एल. पुनिया यांनी योगी सरकारच्या या निर्णयानंतर योगी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊनच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, उत्तर प्रदेशात अद्यापही 15 कोटी जनता गरीबच आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत असल्यामुळे योगी सरकारने दोन दिवसांपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर, आता मोफत रेशनचे धान्य देण्याचाही निर्णय घेतला आहे.