मुख्यमंत्र्यांनी दिले जिल्हा रुग्णालयातील आगीचे सखोल चौकशीचे आदेश ; दोषींवर कठोर कारवाई होणार!


मुंबई – आज एक अतिशय मोठी दुर्घटना अहमदनगरमध्ये घडली. येथील जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागून त्यात १० जणांचा मृत्यू झाला. तर, अन्य काहीजण जखमी देखील झाले आहेत. ही आग रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागल्याचे समोर आले आहे. या विभागात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते आणि हे सर्व रुग्ण कोरोनाबाधित होते, अशी देखील माहिती समोर आली आहे. सर्वत्र या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून, तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही, ते पाहण्यास सांगितले. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच, या गंभीर घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी देखील मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की या गंभीर घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे नाना पटोले यांनी ट्विट केले आहे.