मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी


मुंबई : 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सुनावण्यात आली आहे. त्यामुळे मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल देशमुखांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. ईडीची कोठडी वाढवून देण्यात यावी अशी मागणी ईडीने केली होती. पण आता त्यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडीत रहावं लागणार आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी कोठडी संपल्यानंतर सुनावणीसाठी न्यायालयात हजेरी लावली होती. देशमुख्यांच्या 9 दिवसांच्या कोठडीची मागणी ईडीकडून करण्यात आली होती, तर देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश यांनीही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबईतील बार आणि रेस्टॉरन्ट्सकडून दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्यात यावेत असा आदेश अनिल देशमुखांनी दिला होता आणि याची जबाबदारी त्यांनी सचिन वाझे यांच्यावर सोपवली होती अशी तक्रार केली होती. सीबीआय आणि इडीने त्याची दखल घेऊन अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती. ईडीने पाच वेळा समन्स बजावूनदेखील अनिल देशमुख आले नव्हते. ते आऊट ऑफ रीच होते. त्यानंतर चार दिवसांपूर्वी अनिल देशमुख मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर झाले.

शुक्रवारी ईडी चौकशीला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र हृषिकेश देशमुख हजर राहिले नव्हते. कायदेशीर मार्गांची चापणी केल्यानंतरच ईडी चौकशीला हजर राहणार असल्याची माहिती देशमुख कुटुंबियांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी दिली होती. तर हृषिकेश देशमुख यांनी यासाठी ईडीकडे 15 दिवसांची मुदत देखील मागितल्याची माहितीही त्यांनी दिली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांचे पुत्र हृषिकेश देशमुख यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.