यामुळे राष्ट्रध्वजात वापरला गेला नाही जांभळा रंग

प्रत्येक देशाचा स्वतःचा राष्ट्रध्वज असतो आणि हा ध्वज देशाची आन बान शान मानला जातो. सर्वसामान्य नागरिक, सेना आणि सरकारे आपल्या राष्ट्रध्वजाचा मानसन्मान राखतात कारण हा ध्वज त्या त्या देशाची संस्कृती, देशाचे विचार यांचे प्रतीक असतात. भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा असून यातील केशरी रंग त्याग, शौर्य, बलिदान आणि साहसाचे प्रतिक आहे तर पांढरा रंग शांती, सच्चाई आणि पवित्रतेचे प्रतिक आहे. हिरवा समृद्धीचे प्रतिक आहे हे आपण जाणतो. वल्डोमीटर्स वेबसाईट वरील माहितीप्रमाणे जगात १९५ देश आहेत आणि त्यांचे स्वतःचे राष्ट्रध्वज आहेत. पण फक्त दोन देश वगळले तर कुठल्याची राष्ट्रध्वजात जांभळा रंग वापरला गेलेला नाही. या मागचे कारण मोठे मजेदार आहे.

१८००च्या शतकात जांभळा रंग फार दुर्मिळ होता. जांभळा रंग तयार करणे अतिशय मेहनतीचे आणि खर्चिक सुद्धा होते. त्यामुळे ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनी रॉयल कुटुंबांशिवाय अन्य कुणी जांभळा रंग वापरू नये असा फतवा काढला होता. परिणामी सर्वसामान्य लोक या रंगापासून दूरच होते. त्या काळात जांभळा रंग लेबानन मध्ये सापडणाऱ्या समुद्री गोगलगाई पासून बनविला जात असे. या गोगलगाई जमविणे आणि त्यांच्यापासून हा रंग तयार करणे अतिशय मेहनतीचे आणि खर्चिक होते. कारण १ ग्राम रंग मिळविण्यासाठी १० हजार गोगलगाई माराव्या लागत. परिणामी १ पौंड जांभळा रंग खरेदी करण्यासाठी ४१ लाख रुपये मोजावे लागत असत.

नंतर १८५६ मध्ये विलियम हेन्री पार्किन यांनी कृत्रिम जांभळा रंग तयार करण्यात यश मिळविले. त्यामुळे या रंगाच्या किमती कमी झाल्या पण राष्ट्रध्वजात हा रंग वापरला न जाण्याची प्रथा कायम राहिली ती राहिलीच. आज घडीला डोमीनिया आणि निकाराग्वा या दोन देशाच्या राष्ट्रध्वजात हा रंग पाहायला मिळतो.