सनातन धर्माची पुनर्स्थापना करणारे शंकराचार्य
केदारधाम येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी आदि शंकराचार्य यांच्या १२ फुटी प्रतिमेचे अनावरण केले गेले आहे. केवळ ३२ वर्षाचे आयुष्य लाभलेले आदि शंकराचार्य सनातन धर्माचे पहिले धर्मसुधारक मानले जातात. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत त्यांनी शेकडो धर्मसभा घेतल्या होत्या आणि वेद ज्ञान प्रसार केला होता. त्यातून त्यांनी लयाला गेलेल्या सनातन धर्माची पुनर्स्थापना करण्यात मोठे योगदान दिले होते.
सन ७८८ मध्ये केरळच्या कालडी गावात त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या आईवडिलांना अपत्य नव्हते तेव्हा त्यांच्या आईने महादेवाची तपस्या केली आणि शंकरांनी तिच्या स्वप्नात येऊन तुझ्या पोटी मी जन्म घेईल असा दृष्टांत दिला होता असे सांगतात. त्यानंतर शंकराचार्य यांचा जन्म झाला. केवळ आठव्या वर्षात त्यांना वेदांचे ज्ञान प्राप्त झाले होते. तपस्येसाठी ते नर्मदा किनारी गेले तेव्हा ओंकारेश्वर येथे त्यांना गुरु गोविंद भागवतपाडा यांचे शिष्यत्व लाभले. गुरुनी त्यांना वेद सूक्ते आणि ब्राह्मण ज्ञान देऊन संपूर्ण भारत भ्रमण करण्यास सांगितले.
त्यानुसार शंकराचार्यांनी वेद प्रसार करताना प्रथम वाराणसी आणि नंतर खडतर बद्री यात्रा केली. येथे त्यांनी वेदाची अनेक सूक्ते रचली आणि उपनिषदे लिहिली. हे ज्ञान पूर्ण भारतभर देण्यासाठी त्यांनी देशाच्या कानाकोपर्यात अनेक विद्वान, ज्ञानी लोकांसमवेत वादविवाद आणि चर्चा केल्या.
शंकराचार्यांनी देशाच्या चार कोनात चार पीठे स्थापन केली. दक्षिणेकडे शृंगेरी, उत्तरेकडे ज्योतिर्मठ बद्रीनाथ, पूर्वेकडे जगनाथ पुरी आणि पश्चिमेकडे शारदा पीठ द्वारका अशी हि पीठे आहेत. त्यांनी कोणत्याच देवतेला कधीच कमी मानले नाही. अखेर भ्रमण करताना ते केदारनाथ येथे गेले तेव्हाच त्यांचे देहावसान झाले.