शाहरुखला यंदा ७० हजार तर सलमानला सव्वा लाखाची किंमत
दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळीनंतर चित्रकुट येथे भरणाऱ्या पशु मेळाव्यात गाढवे, घोडे आणि खेचरांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री झाल्याचे वृत्त आहे. हा ऐतिहासिक मेळा गेल्या १०० वर्षांपासून भरविला जात असून मोगल बादशहा औरंगजेब याने सुरु केला होता असे सांगतात. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगढ येथून व्यापारी आणि ग्राहक या मेळ्यासाठी येतात. असे सांगतात कि औरंगजेबाने त्याच्या सेनेसाठी खेचरे आणि गाढवे, घोडे खरेदी करण्यासाठी हा मेळा भरविण्याची सुरवात केली होती. मंदाकिनी नदीकाठी हा मेळा भरतो.
यंदा सुमारे १५ हजार विविध जातींची गाढवे येथे आली होती. पाच हजारापासून त्यांची बोली लागली. गाढवांचा आकार, वय, चण पाहून त्यानुसार ती खरेदी केली जातात. बॉलीवूड कलाकारांची नावे त्यांना दिली जातात. यंदा शाहरुखला ७० हजार किंमत मिळाली तर सलमानला सव्वा लाख रुपये बोली लागली. रणबीर,हृतिक नावाच्या गाढवांना ३० ते ५० हजार रुपये किंमत मिळाली.
चित्रकुट प्रभू रामचंद्राची तपोभूमी मानली जाते आणि दरवर्षी दिवाळी नंतर तीन दिवस येथे हा पशुमेळा किंवा गाढवांचा बाजार भरविला जातो. त्यात १ ते दोन कोटींची उलाढाल होते. या स्थानाचे असे महत्व सांगतात कि हे देशातील असे एकमेव स्थान आहे जेथे बादशहा औरंगजेबने बालाजीच्या नावाने मंदिर बांधले होते.