मुकेश अंबानींनी खरेदी केले  ५९२ कोटींचे लंडन मधील स्टोक पार्क

देशातील बडे उद्योजक आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि त्यांचा परिवार दुसऱ्या घरात राहायला जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली असून हे दुसरे घर भारतात नाही तर लंडन मध्ये आहे. मिड डेच्या रिपोर्ट नुसार अंबानी यांनी लंडन मध्ये बकिंहमशायर येथे ३०० एकरात वसलेले स्टोक पार्क खरेदी केले आहे. त्यासाठी अंबानी यांनी ५९२ कोटींची किंमत चुकती केली असून या अलिशान जागेत  ४९ लग्झरी रूम्स, २१ हवेल्या, २७ गोल्फ कोर्स, १३ टेनिस कोर्ट आणि १४ एकरात खासगी बाग आहे.

रिलायंस उद्योगसमूहाकडून मात्र असे स्पष्ट केले गेले आहे की स्टोक पार्कची खरेदी मुकेश अंबानी यांनी केली असली तरी देश सोडून तेथे कायम वास्तव्यास जाण्याचा त्यांचा किंवा त्यांच्या परिवाराचा कोणताही विचार नाही. रिलायंस ग्रुपच्या आरआयआयएचएल कंपनीने स्टोक पार्कचे अधिग्रहण केले आहे. या हेरीटेज प्रॉपर्टीच्या मदतीने प्रीमियर गोल्फिंग व स्पोर्टिंग स्पोर्ट्सला प्रोत्साहन मिळणार आहे. याचा फायदा कंपनीचा कन्झ्युमर व्यवसाय वाढण्यासाठी होणार आहे. शिवाय भारताच्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीलाही जगभरात ओळख मिळणार आहे.

ही हेरीटेज मालमत्ता पूर्वी खासगी निवासस्थान म्हणून वापरात होती. तिचे १९०८ मध्ये कंट्री क्लब मध्ये परिवर्तन केले गेले होते. जेम्स बाँडच्या एका चित्रपटाचे शुटींग येथे केले गेले होते असेही समजते.