आर्यन खान केस तपासातून समीर वानखेडे बाजूला, संजयसिंग करणार तपास
अमली पदार्थ विरोधी पथकाचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे आर्यन खान, नबाब मलिक यांचे जावई समीर खान सह अन्य पाच केसेसच्या तपासातून बाजूला झाले असून या पुढे या सहा केसेसचा तपास दिल्ली एनसीबीचे पथक करणार आहे. त्यासाठी दिल्ली एनसीबी विभागाने वरिष्ठ अधिकारी संजयसिंग यांच्या नेतृत्वाखाली एक एसआयटी स्थापन केली असून हे पथक शनिवारी दिल्लीहून मुंबई मध्ये येत आहे.
२ ऑक्टोबर रोजी मुंबई गोवा क्रुझवर समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने टाकलेल्या छाप्यात बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान यांच्या मुलासह ८ जणांना अटक केली गेली होती. या सर्वाना आता जामीन मिळाला आहे. मात्र दरम्यान राज्यातील राजकीय पक्षांनी आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नबाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या विरोधात रोज नवनवीन माहिती देऊन समीर वानखेडे भ्रष्ट असल्याचे आरोप सातत्याने केले होते. त्यामुळे समीर यांची दिल्ली ऑफिस कडून चौकशी केली गेली पण त्यांना मुंबईत त्यांच्या पोस्ट वर कायम ठेवले गेले होते. आता आर्यन सह अन्य केसेची जबाबदारी एसआयटी कडे दिली गेली आहे.
याबाबत वानखेडे यांनी त्यांना तपासातून दूर केले गेले नसल्याचा खुलासा करताना म्हटले आहे कि त्यांनीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि त्यात या केसेसचा तपास केंद्रीय एजन्सी दिल्ली कडून केला जावा अशी मागणी केली होती. दिल्ली आणि मुंबई एनसीबी मध्ये समन्वयाचे काम नव्याने स्थापन केलेली एसआयटी करणार आहे.
या समितीचे प्रमुख संजय सिंग हे १९९६च्या बॅचचे ओरिसा केडरचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे आणि अनेक केसेसचा तपास केला आहे. ओरिसा मध्ये ते आयजी होते आणि नंतर त्यांनी सीबीआयचे उपमहानिरीक्षक म्हणून काम केले आहे. सध्या ते एनसीबी मध्ये उपमहानिदेशक आहेत. त्यांनीही अनेक अमली पदार्थ प्रकरणांचा तपास केला आहे.