मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुखांच्या पुत्राला ईडीचे समन्स


मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केली आहे. पण देशमुख कुटुंबियांच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. अनिल देशमुखांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना चौकशीसाठी ईडीने समन्स बजावले आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर आता त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख ईडीच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे. मुलगा ऋषिकेश अनिल देशमुखांचे सर्व पैशांचे व्यवहार पाहात असल्याचे तपासात उघड झाल्यामुळे ईडीने ऋषिकेश देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

गुरुवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश यांना ईडीने समन्स बजावत शुक्रवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. अशातच ऋषिकेश देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांची दिवाळी कोठडीत जाणार आहे. मंगळवारी, पहाटेच्या सुमारास अनिल देशमुख यांना 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली. ईडीने विशेष न्यायालयाकडे 14 दिवसांची कोठडी मागितली होती. पण न्यायालयाने 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.