पंतप्रधान मोदींनी केली केदारनाथ पूजा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड राज्यातील चार धाम मधील एक धाम केदारनाथ येथे आज सकाळी पोहोचले. त्यांनी मंदिरात केदारनाथाला जलाभिषेक केला, प्रार्थना केली. त्यानंतर ते आदि शंकराचार्य समाधिस्थळावर शंकराचार्यांच्या प्रतिमेचे अनावरण करत आहेत. २०१३ च्या नैसर्गिक आपत्ती मध्ये या समाधीचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर आदि शंकराचार्यांची १२ फुट उंच आणि ३५ टन वजनाची प्रतिमा तयार करण्याचे काम सुरु झाले होते. विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाचे थेट प्रसारण देशातील ८७ प्रमुख मंदिरे आणि तीर्थस्थळे येथे केले जात असून ही सर्व मंदिरे आदि शंकराचार्य यांनी स्थापलेली आहेत.

ही ऐतिहासिक घटना संस्मरणीय करण्यासाठी भाजपने राष्ट्रव्यापी कार्यक्रम तयार केला होता. त्यात हिमालयातील चार धाम, १२ ज्योतिर्लिंग व अन्य प्रमुख मंदिरे अशी ८७ तीर्थस्थळे थेट प्रक्षेपणाने जोडली गेली होती. हा सर्व कार्यक्रम एलईडी व मोठ्या स्क्रीनवर प्रसारित केला गेला.

पंतप्रधान आज केदारनाथ धाम येथे अन्य अनेक प्रकल्पांचा शिलान्यास व लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान पदी आल्यापासून मोदी यांची ही पाचवी केदारनाथ यात्रा आहे. २०१९ मध्ये ते येथे आले होते.