म.गांधींच्या स्मरणार्थ दिवाळीत ब्रिटन मध्ये ५ पौंडाचे नाणे जारी

यंदाची दिवाळी भारतासाठीच नाही तर ब्रिटन मध्येही खास ठरली आहे. दिवाळी दिवशी ब्रिटनचे चान्सलर आणि अर्थमंत्री भारतवंशी ऋषी सुनक यांनी भारताचे राष्ट्रपिता म.गांधी यांच्या स्मरणार्थ ५ पौंडाचे सोन्या चांदीत बनविलेले एक खास नाणे जारी केले आहे. गोल आकाराच्या या नाण्यावर भारताचे राष्ट्रीय फुल कमळ आणि म. गांधी यांचे एक वचन ‘ मेरा जीवन ही मेरा संदेश है’ हे वाक्य कोरले गेले आहे. या नाण्याचे डिझाईन हीना ग्लोव्हर यांनी केले आहे.

ब्रिटीश अधिकृत नाण्याच्या माध्यमातून प्रथमच महात्मा गांधी यांचे स्मरण केले गेले आहे. यावेळी बोलताना सुनक म्हणाले,’ एक हिंदू म्हणून दिवाळी मध्ये राष्ट्रपिता म.गांधी यांच्या स्मरणार्थ नाणे जारी करायला मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारताला स्वातंत्र मिळवून देण्यात म.गांधी यांनी फार मोठे योगदान दिले आहे. ब्रिटीश नाण्याच्या माध्यमातून प्रथमच म.गांधी यांचे स्मरण केले गेले आहे.

हे नाणे आत्ता जारी होण्यात आणखीही एका योग आहे. यंदा भारताचा ७५ वा स्वातंत्रदिन साजरा होत आहे. ब्रिटन आणि भारत यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यासाठी याचा उपयोग होईल. जारी झालेले नाणे सामान्य चलनात आणले जाणार नाही. सोने चांदी मध्ये तयार केलेल्या या नाण्याची विक्री गुरुवार पासून सुरु झाली आहे.