बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी दोन दलित संघटनांनी समीर वानखेडेंविरोधात दाखल केली तक्रार


मुंबई – खोटे जात प्रमाणपत्र नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दाखविल्याचा आरोप करत दोन दलित संघटनांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वानखेडे यांनी एससी प्रवर्गात खोटी जात दाखवल्याचा आरोप स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी आणि भीम आर्मी या दोन संघटनांनी केला आहे. नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा केला. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गांतर्गत भारतीय महसूल सेवेत येण्यासाठी त्यांनी खोटे करून हिंदू जात प्रमाणपत्र बनवल्याचाही आरोप केला होता.

नवाब मलिक यांनी ट्विट करत समीर वानखेडे जन्माने मुस्लिम असल्याचे सिद्ध करण्यासाठी वानखेडे यांच्या जन्म प्रमाणपत्राची एक प्रत देखील शेअर केली होती. ज्यामध्ये वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद के. वानखेडे आहे, तर एनसीबीच्या वेबसाईटनुसार त्यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव वानखेडे आहे. केंद्रीय नागरी सेवा परीक्षेद्वारे निवड झालेल्या समीर वानखेडेचा जन्म इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्या वडिलांच्या पोटी झाला आणि वानखेडे यांनी दलितांसाठी राखीव जागेचा लाभ घेण्यासाठी वडिलांचे नाव बदलले, असा आरोप मलिक यांनी केला होता. दरम्यान, वानखेडे यांनी मलिकांचा आरोप फेटाळून लावला आहे.

विशेष म्हणजे समीर वानखेडेचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांचा जन्म महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यातील एका दलित कुटुंबात झाला होता, मात्र त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारून मुंबईतील एका मुस्लिम महिलेशी लग्न केले आणि दाऊद हे नाव स्वीकारले, असे नवाब मलिक यांनी म्हटले होते. माझे वडील हिंदू आहेत आणि माझी आई मुस्लिम होती, असे समीर वानखेडेंनी निवेदनात म्हटले आहे. तसेच त्यांनी त्यांचा दावा सिद्ध करण्यासाठी त्यांच्या वडिलांचे जात प्रमाणपत्र प्रसारित केले होते.