दारूबंदी असलेल्या या राज्यामध्ये विषारी दारूमुळे १४ जणांचा मृत्यू; अनेक जण गंभीर


पाटना – गेल्या २४ तासांत दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये १४ जणांचा विषारी दारू प्यायल्यामुळे मृत्यू झाला आहे. गोपालगंज जिल्ह्यात सहा आणि बेतिया जिल्ह्यात सुमारे आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विषारी दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंवरून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर आरजेडी नेते मनोज झा यांनी निशाणा साधला आहे. हेच राज्यातील कटू सत्य असल्याचे झा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गोपालगंज जिल्ह्यातील महमदपूर पोलीस ठाण्याच्या आसपासच्या गावातील लोकांनी मंगळवारी दारू प्यायली. यानंतरच अनेकांची तब्येत बिघडू लागली, त्यानंतर त्या लोकांना मोतिहारी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्याचवेळी बेतिया येथे देशी बनावटीची विषारी दारू प्यायल्यामुळे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मद्यप्राशन केल्यानंतर अनेकांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यानच ८ जणांचा मृत्यू झाला.

बनावट दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंवरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा यांनी निशाणा साधला. मनोज झा यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री जी, हे तुमच्या दारुबंदीचे क्रूर सत्य आहे….पण तुम्ही काळजी करू नका आणि चिंतनही करू नका…काहीही करून निवडणूक जिंकून घ्या… बाकीचे जनतेला भोगू… कुटुंब उद्ध्वस्त होऊ द्या…तुम्हाला काय?, असे म्हटले आहे.