आधीच्या सरकारने कब्रस्थानांवर पैसा खर्च केला, तर आता मंदिरांवर होत आहे खर्च : योगी आदित्यनाथ


लखनौ – जवळजवळ पाच वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या तत्कालीन समाजावादी पक्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका करताना कब्रस्थान आणि स्मशानभूमीची तुलना करणारे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी याच वक्तव्याची आठवण करुन देणारे एक वक्तव्य केले आहे. योगी यांनी हे वक्तव्य आपल्या सरकारने केलेल्या कामांचा दाखला देताना केले आहे. आमच्या सरकारने सरकारी पैसा हा मंदिरांची सजावट, पुन:निर्माणासाठी वापरला. केवळ कब्रस्थानांभोवती कुंपणाच्या भींती बांधण्यासाठी आधीच्या सरकारने पैसा वापरला होता, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.

योगींनी हे वक्तव्य अयोध्येमधील दिपोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये जनतेला आणि आपल्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांना संबोधित करताना केले. उत्तर प्रदेशमध्ये बदल दिसत आहे. पूर्वी राज्यामधील लोकांचा पैसा (सरकारी निधी) का कब्रस्थानांच्या भींती बांधण्यासाठी खर्च केला जायचा. हा पैसा आज मंदिरांचा पुन:विकास आणि सुशोभिकरणासाठी वापरला जात आहे. हा विचारांमधील फरक आहे. ज्यांना कब्रस्थानांची काळजी होती त्यांनी त्या ठिकाणी पैसा खर्च केला. ज्यांना धर्म आणि संस्कृतीची चिंता आहे, ते सध्या पैसा धर्म आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी वापरत असल्याचेही योगींनी सरकारचे काम कशापद्धतीने केले जात आहे याबद्दल बोलताना सांगितले.

पुढील वर्षाच्या सुरुवातील होणाऱ्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्यनाथ यांच्या वक्तव्याला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. मोदींनी यापूर्वी २०१७ साली फतेहपुरमधील भाषणामध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. सत्ताधारी समाजवादी पक्ष हा भेदभाव करत असल्याचा आरोप करत मोदींनी हे वक्तव्य केले. एकाद्या गावात कब्रस्थान होत असेल, तर तिथे स्मशानभूमी सुद्धा झाली पाहिजे. जर रमझानच्या वेळेस भारनियमन केले जात नसेल, तर दिवाळीच्या वेळेसही केले जाऊ नये. जर होळीच्या दिवशी वीज असेल तर ईदच्या दिवशीही वीज पुरवठा खंडित होता कामा नये. कोणताही भेदभाव येथे असू नये, असे मोदी म्हणाले होते.