केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केली अनुक्रमे पाच आणि दहा रुपयांची कपात


मुंबई : केंद्र सरकारकडून दिवाळीच्या शुभमुहुर्तावर काल सामान्य लोकांना काहीसा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केंद्र सरकारने अनुक्रमे पाच आणि दहा रुपयांची कपात करण्याचा काल निर्णय घेतला. राज्यांनीही त्यांच्या व्हॅट करात कपात करण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. याला प्रतिसाद देत तात्काळ गोव्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अतिरिक्त सात रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा निर्णय जाहीर केला. आता महाराष्ट्रात व्हॅट करात कधी कपात होणार? असा सवाल केला जात आहे.

भाजप शासित राज्यांपैकी गोव्याने केंद्राचा निर्णय आल्यानंतर व्हॅटमध्ये कपात केली आहे. गोव्यासह उत्तरप्रदेश, मणिपूर, कर्नाटक, उत्तराखंड या राज्यांनीही अतिरिक्त व्हॅट कपात केली आहे. आता अन्य भाजपशासित राज्य काय निर्णय घेतात याकडेही लक्ष लागून आहे. दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या किमतीवरुन केंद्राच्या विरोधात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने रस्त्यावर उतरुन आंदोलन केले होते. केंद्राने आता कपातीचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी व्हॅट कपात कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

केंद्राने काल निर्णय घेतल्यानंतर लगेच गोवा सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे गोव्यात आता पेट्रोल 12 रुपयाने आणि डिझेल 17 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या संदेशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करुन मोदींनी देशातील जनतेला दिवाळी भेट दिल्याचे म्हटले आहे . त्यामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत गोवा सरकार पेट्रोलच्या दरात अतिरिक्त सात रुपये आणि डिझेलच्या दरात अतिरिक्त सात रुपये कपात करत असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले.

प्रति लिटर पेट्रोलमागे 5 रुपये, तर प्रति लिटर डिझेलमागे 10 रुपये केंद्र सरकारने कमी केले आहेत. त्यामुळे सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती आता अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. पेट्रोल-डिझेलचे कमी झालेले दर हे आजपासून लागू असतील, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरच्या एक्साईज टॅक्समध्ये पाच रुपये तर डिझेसवरच्या एक्साईज टॅक्समध्ये 10 रुपये कमी केल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती उतरल्या आहेत.