रोहित पवारांचा इंधन दर कपातीनंतर केंद्राला सल्ला


मुंबई – केंद्र सरकार तसेच काही राज्य सरकारांकडून पेट्रोल आणि वाढलेल्या डिझेलच्या किमतींमुळे हैराण झालेल्या लोकांना दिवाळीपूर्वी मोठी भेट दिली आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये आणि डिझेलवर १० रुपये प्रति लिटर कपात करण्याची केंद्र सरकारने घोषणा केली आहे. त्यामुळे इंधनदराच्या भडक्यामुळे त्रासलेल्या नागरिकांना केंद्र सरकारने बुधवारी काही प्रमाणात दिलासा दिला आहे. केंद्राने इंधनावरील केलेली कपात आज गुरुवारपासून लागू झाली आहे.

इंधनदरात गेल्या काही महिन्यांपासून झपाट्याने वाढ होत असून, मुंबईत पेट्रोल ११५.८५ रुपयांवर पोहोचले. दिल्लीतही पेट्रोलदराने ११० रुपयांचा टप्पा ओलांडला. देशातील जवळपास सर्व मोठ्या शहरांत पेट्रोलने शंभरी ओलांडली असून, डिझेलनेही नवा उच्चांक गाठला होता. भाजप नेत्यांनी केंद्राच्या निर्णयानंतर नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे, तर या निर्णयाचे स्वागत करत विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. कर्जत जामखेडेचे आमदार रोहित पवार यांनीही मोदी सरकारचे आभार मानले आहेत. तसेच गॅस सबसिडीबाबतही विचार करण्याचा सल्ला दिला आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.

केंद्र सरकारने पेट्रोलवर ५ तर डिझेलवर १० कर कमी केल्याने राज्याचेही पेट्रोलवरील १ आणि डिझेलवरील २ कमी होतील. कदाचित देशात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मतदारांनी झटका दिल्यानंतर केंद्र सरकारला उशिरा का होईना दिवाळीच्या निमित्ताने जाग आली हे महत्वाचे आहे, याबाबत आभार!

आता इतक्या दिवसांनी जाग आलीच आहे तर महागाईने ‘गॅस’वर असलेल्या सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी गॅस सबसिडीबाबतही विचार करावा. तसेच #GST सह राज्याचा हक्काचा थकीत निधीही वेळच्यावेळी द्यावा, ही विनंती!

कोरोनाच्या काळात लोकं अडचणीत असताना आणि बेरोजगारी वाढली असतानाच पेट्रोल-डिझेलवर आजवरच्या इतिहासात सर्वाधिक कर केंद्र सरकारने या दोन-तीन वर्षांच्या काळात आकारला. त्यामुळं तो तातडीने कमी करण्याची गरज असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.