देशातील ‘घुमंतू’ समुदायाला लवकरच मिळू शकते इतर मागासवर्गीय श्रेणीबाहेर आरक्षण – रामदास आठवले


नवी दिल्ली – लवकरच इतर मागासवर्गीय श्रेणीबाहेर भटक्या जमाती म्हणजेच देशातील ‘घुमंतू’ समुदायाला आरक्षण मिळू शकते. केंद्र सरकार या जमातींना आरक्षण देण्याचा विचार करत असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. सरकार भटक्या जमातींच्या दुर्दशेवर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बीआर इदाते समितीने सादर केलेल्या अहवालाचा विचार करत असल्याचे ते म्हणाले.

अहवालाचा आम्ही विचार करत आहोत आणि मंत्रालय या शिफारशींचा बारकाईने अभ्यास करत आहे आणि त्यावर लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ओबीसींच्या बाहेर भटक्या जमातींना आरक्षण देता येईल का याचा आम्ही विचार करत आहोत. सुमारे १० टक्के आरक्षणाची शिफारस समितीने केली आहे, परंतु मंत्रालय अद्याप अहवालाचा अभ्यास करत आहे आणि अद्याप कोणताच निर्णय घेतला नसल्याचे आठवले इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले.

देशभरात बालकिशन रंके समितीने सर्वेक्षण केले आहे आणि भटक्या जमातींच्या अवस्थेवर प्रकाश टाकला आहे. तसेच त्यांची मुले शिक्षणापासून कशी वंचित राहिली आहेत, याचाही समितीने उल्लेख केला आहे. शिवाय, भटक्या जमातींना वेगळे आरक्षण देता येईल का, याचाही अभ्यास सुरू असल्याचेही केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले.