प्रदर्शनापूर्वीच अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ने जमवला एवढ्या कोटींचा गल्ला


उद्या म्हणजेच ५ नोव्हेंबरपासून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात येत होती. पण आता अखेर ५ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतासह अनेक देशातही हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. हा चित्रपट जवळपास ५ हजार २०० स्क्रीन्सवर प्रदर्शित केला जाणार आहे. पण प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटाच्या कमाईला सुरुवात झाली आहे.

‘सूर्यवंशी’ चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वी २०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘सूर्यवंशी’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांच्या राईट्सद्वारे त्यांनी २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे ओटीटी राईट्स जवळपास १४० कोटी रुपयांना विकण्यात आले आहेत. तर म्यूझिकच्या राईट्ससाठी जवळपास ६० कोटी रुपये मिळाले आहेत.

एकूण जवळपास २२५ कोटी एवढा खर्च या चित्रपटासाठी आल्याचे बोलले जात आहे. २०० कोटी रुपयात या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून त्याच्या प्रमोशनसाठी २५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे आता या चित्रपटाची चित्रपटगृहांमधील कमाई ही निर्मात्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दणक्यात कमाई करेल, असा विश्वास अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत असल्याने अनेक प्रेक्षकही तो पाहण्यास उत्सुक आहेत.