‘जय भीम’ चित्रपटातील तो सीन हटवण्याची केली जात आहे मागणी


२ नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तमिळ सुपरस्टार सूर्याचा ‘जम भीम’ हा चित्रपट रिलीज झाला होता. पण आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील एका सीनवर आक्षेप घेतला जात असून तो हटवण्याची मागणी सोशल मीडियावर केली जात आहे.

अभिनेते प्रकाश राज यांनी टी जे ज्ञानवेल यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जय भीम’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. चित्रपटातील एका सीनमध्ये त्यांनी हिंदी बोलणाऱ्या एका व्यक्तीच्या कानशिलात लगावली आहे. हा सीन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या सीनवर काही यूजरने आक्षेप घेतला असून चित्रपटातून हटवण्याची मागणी केली आहे. एका यूजरने आम्ही तामिळ चित्रपटांची वाट पाहात असतो. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर मला वाईट वाटले. अशा सीन्सची खरच चित्रपटात गरज नाही. आशा आहे की निर्माते असे सीन्स हटवतील असे म्हटले आहे.


‘जय भीम’ चित्रपटातील एका सीनमध्ये प्रकाश राज यांच्याशी एक व्यक्ती हिंदी भाषेत बोलत असतो. त्यावेळी प्रकाश राज त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावतात. त्यानंतर ती व्यक्ती मला का मारले असा प्रश्न विचारताना दिसत आहे. त्यावर प्रकाश राज यांनी तमिळमध्ये बोल असे म्हणतात. याच सीनवर सध्या आक्षेप घेतला जात आहे.