काँग्रेसने उडवली मोदी सरकारच्या इंधन दरकपातीच्या निर्णयाची खिल्ली


नवी दिल्ली – केंद्र सरकारने बुधवारी इंधनदराच्या भडक्यामुळे त्रासलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा दिला. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये, तर डिझेलवरील शुल्कात दहा रुपये केंद्राने कपात केली. केंद्राच्या या निर्णयाची काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी खिल्ली उडवली. हा निर्णय भीतीपोटी घेण्यात आल्याचे काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हा भीतीने घेतलेला निर्णय आहे, मनापासून नाही. वसूली सरकारला येणाऱ्या निवडणुकीत या लुटीचे उत्तर मिळेल, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान केंद्र सरकारने बुधवारी इंधनदराच्या भडक्यामुळे त्रासलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा दिला. केंद्राने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये, तर डिझेलवरील शुल्कात दहा रुपये कपात केली असून, ती आज गुरुवारपासून लागू होईल.


इंधनदरात गेल्या काही महिन्यांपासून झपाट्याने वाढ होत असून, मुंबईत पेट्रोल ११५.८५ रुपयांवर पोहोचले. दिल्लीतही पेट्रोलदराने ११० रुपयांचा टप्पा ओलांडला. देशातील जवळपास सर्व मोठ्या शहरांत पेट्रोलने शंभरी ओलांडली असून, डिझेलनेही नवा उच्चांक गाठला.

इंधन दरवाढीमुळे इतर वस्तूंचीही भाववाढ झाल्यामुळे ऐन सणासुदीत ग्राहकांना महागाईस सामोरे जावे लागत आहे. त्यावरून काँग्रेससह विरोधकांनी केंद्रातील भाजप सरकारला सातत्याने लक्ष्य केले. लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत काही ठिकाणी सत्ताधारी भाजपला पराभवाचा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर अखेर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पेट्रोलदरात पाच रुपयांची, तर डिझेलदरात दहा रुपयांची कपात होईल.