पेट्रोल पंपावर मोदी लोकांना आम्हाला मत दिल्याची किंमत चुकवा असा आशीर्वाद देतात – संजय राऊत


मुंबई – दिवाळीपूर्वी केंद्र सरकार तसेच काही राज्य सरकारांकडून पेट्रोल आणि वाढलेल्या डिझेलच्या किमतींमुळे हैराण झालेल्या लोकांना मोठी भेट मिळाली आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये आणि डिझेलवर १० रुपये प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यामुळे इंधनदराच्या भडक्यामुळे त्रासलेल्या नागरिकांना केंद्र सरकारने बुधवारी काही प्रमाणात दिलासा दिला आहे. आज गुरुवारपासून केंद्राने इंधनावरील केलेली कपात लागू झाली आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

मन मोठे असण्यासाठी आधी मन असावे लागते. पाच रुपयांची नोट आम्हाला दाखवत आहात. किमान २५ रुपये इंधन कपात कराला हवी होती आणि त्यानंतर ५० रुपये. १०० रुपये वाढवायचे आणि पाच रुपये कमी करायचे हे कसले मोठे मन? मग दरवाढ केली, हे सुद्धा मन मोठे असण्याचे लक्षण आहे का? ज्यांचे मन कठोर आहे तेच पेट्रोल डिझेलचे दर वाढवू शकतात. पेट्रोल पंपावर लोक मोदींकडे बघतात, मग मोदी त्यांना आम्हाला मत दिल्याची किंमत चुकवा असा आशिर्वाद देतात. २०२४ साली हेही दिवस जातील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकार पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणार का यावर प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात चर्चा सुरु असून लोकांच्या महागाई संदर्भात महाराष्ट्र सरकारने प्रश्न उपस्थित केले आहेत. पण केंद्र सरकार या सर्व गोष्टींना जबाबदार आहे. पेट्रोल डिझेलच्या भाववाढीतून केंद्र सरकारने बेहिशेबी पैसे कमावले आणि आता फक्त पाच रुपये कमी करत आहात. २५-३० रुपये कमी केले असते, तर भाजपवाले सांगतात तसे मोठे मन दिसले असते, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेवरही उत्तर दिले. यासाठी केंद्राकडेच बोट दाखवावे लागेल. पेट्रोल डिझेलचे भाव राज्य सरकार वाढवत नाही. तुमच्याकडे भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी बोट दाखवले, तर त्यांची बोटे छाटणार का तुम्ही. देशासंदर्भात धोरणात्मक निर्णय तुम्हीच घेता मग बोट कुणाकडे अमेरिकेकडे, बायडेन यांच्याकडे दाखवायचे?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.