अयोध्येत शरयू तीरी तेवले नवलाख दिवे, बनले गिनीज रेकॉर्ड

यंदाच्या दीपोत्सवात प्रभू रामचंद्रांच्या अयोध्या नगरीत शरयूतीरी रामपौडीवर अल्पावधीत जगाचे आकर्षण बनलेला दीपोत्सव मोठ्या दिमाखात साजरा झाला आणि त्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. १० हजार विदेशी पाहुणे आणि अवध नगरीतील २० हजाराहून अधिक युवकांनी  तसेच ई प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कोट्यावधी प्रेक्षकांनी हा आनंद सोहळा पहिला. यंदा दीपोत्सवात ९,४१,५५१ पणत्या एकाचवेळी तेवल्या आणि त्याचे गिनीज रेकॉर्ड नोंदविले गेले. यंदा साडेसात लाख पणत्या पेटविण्याचे ध्येय नक्की केले गेले होते पण अवधच्या हजारो युवकांनी १०,९५,६४५ पणत्या नदीकाठी मांडल्या होत्या त्यातील ९,४१,५५१ पणत्या ४० मिनिटांच्या काळात पेटविल्या गेल्या आणि सलग पाच मिनिटे या पणत्या तेवत राहिल्या असे समजते.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते दीपोत्सवाचे उद्घाटन झाले. सूर्य मावळताच अयोध्येत लक्षलक्ष दिपज्योतींच्या प्रकाशात जणू त्रेता युग जिवंत झाले. योगी आदित्यनाथ व अन्य उपस्थित मंत्र्यांनी ५१०० दिवे घेऊन आरती केली आणि पूर्ण अयोध्या नगरी पणत्यांच्या प्रकाशात झगमगून उठली. गेल्या वर्षीपेक्षा यंदा सुमारे सव्वा तीन लाख अधिक पणत्या लावल्या गेल्या होत्या. रामायणकालीन दृश्यांनी उपस्थिताना मंत्रमुग्ध केले.

योगी आदित्यनाथ यांनी २०१७ मध्ये उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून अयोध्येत शरयू काठी दीपोत्सवाची परंपरा सुरु केली असून अयोध्येला सांस्कृतिक राजधानी म्हणून विकसित केले जात आहे. श्रीराम जन्मभूमी गर्भगृह आणि राममंदिर बांधकाम ठिकाणी सुद्धा यावेळी ५१ हजार दिवे लावले गेले होते.