नौशेरा सीमेवर जवानांसोबत पंतप्रधान मोदींची दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची दिवाळी राजौरी नौशेरा नियंत्रण सीमा रेषेवरील शेवटच्या चौकीवर सैनिकांसोबत साजरी करत आहेत. गुरुवारी ११ वाजता मोदी जम्मू विमानतळावरून नौशेरा येथे रवाना होत आहेत. २०१९ मध्ये मोदींनी राजौरी येथील इन्फंट्री डिव्हिजन मधील सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. मोदी जात असलेल्या नौशेरा भागात गेले तीन आठवडे दहशतवादी विरोधी मोहीम सुरु असल्याने तेथे सुरक्षा संस्थाना हाय अॅलर्ट दिला गेला आहे. या काळात दहशवाद्यांनी येथे वारंवार केलेल्या हल्ल्यात एका ठिकाणी पाच तर दुसऱ्या ठिकाणी चार जवान शहीद झाले आहेत. पंतप्रधान मोदी या चौकीवर तीन ते चार तास थांबणार आहेत असे समजते.

पंतप्रधान प्रथम सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतील आणि नंतर ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक आणि चर्चा करणार आहेत. पंतप्रधानपदी आल्यापासून  मोदी चौथ्या वेळी जम्मू काश्मीर लदाख सीमेवर दिवाळी साजरी करणार आहेत. यापूर्वी २०१४ मध्ये त्यांनी सियाचीन मध्ये २०१७ ला बांदीपोरा येथे सैनिक आणि बीएसएफ जवानांसोबत ,२०१९ मध्ये राजौरी येथे तर २०२० मध्ये राजस्थान जैसलमेर मधील लोन्गोवाला बॉर्डरवर दिवाळी साजरी केली आहे.