गोल्डमन भप्पी लाहिरी यांनी यंदा केली सोन्याच्या टीसेटची खरेदी

भरमसाठ सोन्याच्या चेन, हातातील ब्रेसलेट, अंगठ्या यामुळे बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये गोल्डमन अशी ओळख असलेले संगीतकार आणि गायक भप्पी लहरी यांनी यंदाच्या धनत्रयोदशीला मुहूर्तावर दागिन्यांना फाटा देऊन सोन्याच्या टी सेटची खरेदी केली आहे. या वर्षी त्यांनी पत्नीकडून चहा पिण्याच्या सोन्याच्या कपबश्या व अन्य समान गिफ्ट म्हणून घेतले. टी सेट घेण्यामागचे कारण देताना ते म्हणाले माझ्याकडे दागिने खूप झालेत म्हणून ही नवी वस्तू यंदा खरेदी करण्याचे ठरविले होते.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी दिवाळी आणि धनत्रयोदशी सेलेब्रेशन बद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. त्यावेळी ते म्हणाले काही दिवसापूर्वी मी एक सुंदर सोन्याचा टीसेट पहिला होता आणि माझ्या मनात तो फार भरला होता. म्हणून मी पत्नीला तोच सेट धनत्रयोदशी दिवशी गिफ्ट करण्यास सांगितले होते. धनत्रयोदशी दिवशी सोने खरेदी करणे शुभ आहे. दरवर्षी आम्ही ही परंपरा पाळतो. माझ्याकडे सोन्याच्या चेन, अंगठ्या असे खूप दागिने आहेत. त्यामुळे यावेळी दागिन्याला ऑप्शन म्हणून हा सुंदर सेट खरेदी केला.

भप्पी म्हणाले माझ्यासाठी सोने फार लकी आहे. जेव्हा मी सोने अंगावर घालून काम केले होते ती सारी गाणी हिट झाली असा माझा अनुभव आहे. त्यामुळे मी नेहमी अंगावर भरपूर सोने घालतो. लोकांनी मला गोल्डमन नाव दिले आहे ते मला मनापासून आवडते असेही त्यांनी सांगितले.