पुढील ३-४ दिवस राज्यातील लसीकरण बंद रहाणार


मुंबई – आज देशातील कोरोना लसीकरण मोहिमेचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. विशेषतः ज्या जिल्ह्यात लसीकरणाचा वेग कमी आहे, त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संवाद मोदी यांनी साधला. महाराष्ट्राचाही यामध्ये समावेश होता. घरोघरी जात लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सुचना केल्या, स्थानिक धर्मगुरुंची मदत घेण्याचा सल्लाही मोदी यांनी यावेळी दिला. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात पहिला डोस १०० टक्के नागरीकांना दिला जावा, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. थोडक्यात लसीकरणाचा वेग वाढवा अशा सुचना राज्य आणि केंद्र पातळीवरुन दिल्या जात आहेत.

असे असताना राज्यात पुढील ३-४ दिवस कोरोना लसीकरण बंद रहाणार आहे. अर्थात दिवाळीमुळे लसीकरण बंद ठेवणार असल्याचे राज्यातील बहुतेक सर्व महानगरपालिकांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी जाहीर केल्यामुळे पुढील ३-४ दिवस राज्यातील लसीकरणाचा वेग हा कमी असणार आहे. प्रामुख्याने मुंबई, पुणे महानगरपालिकांनी तशी घोषणाही केली आहे.

तरीही राज्याकडे पुरेसा लशींचा साठा आहे, लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे राज्यात लसीकरणाचा वेग दिवाळीनंतर पुन्हा वाढेल असे चित्र आहे. गेले काही दिवस राज्यात कोरोना बाधित दैनंदिन रुग्ण संख्या ही एक हजाराच्या आसपास नोंदवली जात आहे. थोडक्यात राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव हा मंदावला असून तो दीड वर्षातील निचतम पातळीवर आहे. राज्यात आत्तापर्यंत ९ कोटी ९० लाख लोकांचे लसीकरण झाले असून लसीचे दोन डोस मिळाल्याचे प्रमाणही लक्षणीय आहे.