तीन दिवस बंद राहणार पुण्यातील लसीकरण


पुणे – गुरुवार, शनिवार आणि रविवारी म्हणजेच, लसीकरण होणार नाही. शुक्रवारी केवळ सकाळच्या सत्रात पुण्यातील सरकारी रुग्णालयामध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणाला दिवाळीमध्ये नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 18 वर्षांवरील 100 टक्के पुणेकरांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. आता नागरिकांनी दुसरा डोस घ्यावा, यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

कोरोना लसीकरणाला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद देत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्यातील लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. अशातच पुण्यात 18 वर्षांवरील 100 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. दरम्यान, आता सणासुदीच्या दिवसात लोक कामांमध्ये गुंतलेली असतात. त्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच दिवाळी पाडव्याच्या दिवशी लसीकरण केंद्राचे कामकाज अर्धा दिवस सुरू राहील, अशी माहिती पुणे महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून पुण्यातील कोरोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढला आहे. पण, दिवाळीमुळे केंद्रावर येऊन लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे येत्या उद्या (गुरुवारी) नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असल्यामुळे केंद्रावर लसीकरण होणार नाही. शुक्रवारी सकाळच्या सत्रात हे लसीकरण होईल. दुपारनंतर केंद्र बंद राहणार असल्यामुळे त्यानंतर येत्या शनिवारी आणि रविवारीसुद्धा लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली आहे.

गुरुवार, शनिवार आणि रविवार हे तीन दिवस तसेच, शुक्रवारी दुपार वगळून इतर दिवशी लसीकरण नेहमीप्रमाणे सुरळीत सुरु असणार आहे. दिवाळीच्या दिवसांत लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे लसीकरण मोहिम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.