आयकर विभागाने अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आणलेली नाही


मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी निगडीत कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही, त्याचबरोबर अजित पवार यांना त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही. प्रसिद्धी माध्यमात यासंदर्भात येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचे असल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांच्याकडून देण्यात आले आहे.

प्रसिद्धी माध्यमांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात प्रसारित होत असलेल्या बातम्यांचे खंडन करताना त्यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील म्हणाले की, अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आलेली नाही किंवा त्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आलेली नाही. काही मुद्द्यांवर आयकर विभागाकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्या पत्राला योग्य ते उत्तर देण्यात येईल. प्रशासकीय आणि कायदेशीर मार्गाने योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही वकिलांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. वस्तुस्थिती तपासून प्रसार माध्यमांनी बातम्या द्याव्यात व कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे करण्यात आले आहे.