लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी स्थानिक धर्मगुरूंची मदत घ्या ; नरेंद्र मोदींचे आवाहन


नवी दिल्ली – कोरोनापासून रक्षण करण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात मंगळवारपर्यंत १०७ कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेश दौऱ्यावरुन आल्यानंतर आज (बुधवार) लसीकरणाचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदींनी यामध्ये ४० जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या आढावा बैठकीत उपस्थित होते.

आतापर्यंत लसीकरणात झालेली प्रगती ही तुमच्या मेहनतीमुळे आहे. प्रशासनातील प्रत्येक सदस्य, आशा कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी मैल पायी चालत दुर्गम ठिकाणी लसीकरण केले. पण १०० कोटी डोस झाले असले, तरी जर आपण हलगर्जीपणा केला, तर एक नवीन संकट येऊ शकते, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना दिला.

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, लसीकरणात हलगर्जीपणा केल्यामुळे अनेक विकसित देशात कोरोनाचे संकट पुन्हा आले आहे. आपण हे मुळीच स्विकारु शकत नाही. आपण हे सहन करू शकणार नसल्यामुळे लसीचे दोन्ही डोस वेळेवर घेणे खूप महत्वाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, १०० वर्षांतील या सर्वात मोठ्या महामारीमध्ये देशाने अनेक आव्हानांचा सामना केला आहे. देशाच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात एक खास गोष्ट म्हणजे आपण नवीन उपाय शोधले, नवनवीन मार्गांचा उपयोग केला. तुमच्या जिल्ह्यांमध्ये लसीकरण वाढवण्यासाठी तुम्हाला नवीन नाविन्यपूर्ण मार्गांवर अधिक काम करावे लागेल. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील प्रत्येक गाव, प्रत्येक शहरासाठी वेगळी रणनीती बनवायची असेल, तर तीही बनवा. तुम्ही प्रदेशानुसार २०-२५ लोकांची टीम तयार करून देखील हे करू शकता.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, अफवा आणि गोंधळ हे एक आव्हान लोकांमध्ये आहे. यासाठी एक मोठा उपाय म्हणजे लोकांना अधिकाधिक जागरूक करणे. यामध्ये तुम्ही स्थानिक धर्मगुरूंची धेखील मदत घेऊ शकता. काही दिवसांपूर्वी मी पोप फ्रान्सिस यांचीही भेट घेतली होती. लसीबाबत धर्मगुरूंचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यावरही आपल्याला विशेष भर द्यावा लागेल. आपण ‘सबको वैक्सीन, मुफ्त वैक्सीन’ मोहिमेअंतर्गत एका दिवसात सुमारे २.५ कोटी लसीचे डोस दिले आहेत. यातून आपली क्षमता काय आहे, आपले सामर्थ्य काय आहे हे दिसून येते.