राहुल गांधींनी शाहरुख खानला आर्यन तुरुंगात असताना लिहिले होते पत्र


मुंबई – शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अटक केली होती. पण, सध्या आर्यन खान जामिनावर तुरुंगाबाहेर आहे. पण, आता अशी माहिती समोर आली आहे की, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आर्यन खान तुरुंगात असताना अभिनेता शाहरुख खानला पत्र लिहून देश तुमच्या पाठिशी असल्याचे सांगत त्याला प्रोत्साहन दिले होते. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती एनडीटीव्हीने दिली आहे. १४ ऑक्टोबरला हे पत्र राहुल गांधींनी लिहले होते.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्जच्या संदर्भात क्रूझवर छापा टाकत एनसीबीने ३ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. आर्यन यानंतर ८ ऑक्टोबरपासून आर्थर रोड कारागृहात बंद होता. आर्यन ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता तुरुंगातून जामीनावर बाहेर आला.

आर्यनचे नाव ड्रग्ज प्रकरणात समोर आल्यानंतर अनेक प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी आर्यन खानच्या समर्थनार्थ उभे राहिले. सलमान खान, हृतिक रोशन आणि चित्रपट निर्मात्या फराह खान यांनी शाहरुख खानला धीर दिला होता. या प्रकरणानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोपांचा सपाटा सुरु ठेवला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानला जामीन मंजूर करण्यापूर्वीच विशेष न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी शनिवारी मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणी नऊ आरोपींना जामीन मंजूर केला होता. त्यावेळी न्यायालयाने आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मॉडेल मुनमुन धमेचा यांनाही जामीन मंजूर केला. अचित कुमारला २.६ ग्रॅम गांजासह एनसीबीने अटक केली होती. तो आर्यन खानसोबत व्हॉट्सअ‍ॅप चॅट करत असल्याचा दावाही एनसीबीने केला होता. अचित कुमार हा ड्रग्ज सप्लायर असून तो गांजाचीही तस्करी करतो, असा दावा एनसीबीने केला होता. पण आचितच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना असे म्हटले की, एनसीबीने पुराव्यांचा कोणताही आधार नसताना आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांचा कुमारवर फार मोठा परिणाम होऊ शकतो. त्याच्या करिअरवर याचा प्रभाव पडू शकतो.