अनिल देशमुखांवरील आरोपांप्रकरणी पुरावे नसल्याचे परमबीर सिंग यांचे प्रतिज्ञापत्र


मुंबई – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चौकशी आयोगासमोर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रकरणात सादर करण्यासाठी आपल्याकडे आणखी कोणतेही पुरावे नसल्याचे त्यांनी आयोगाला सांगितले. परमबीर सिंग यांनी आयोगाच्या सुनावणीत प्रतिज्ञापत्र सादर केल्याची पुष्टी त्यांच्या वकिलाने बुधवारी केली.

महाराष्ट्र सरकारने या वर्षी मार्च महिन्यात परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांच्या एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती. परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अनेक समन्स आणि जामीनपात्र वॉरंट आयोगाने जारी करूनही, ते आतापर्यंत हजर झालेले नाही. आयोगाने परमबीर सिंग यांना तीनदा दंड ठोठावला होता. जून महिन्यात ५ हजार आणि इतर दोनदा गैरहजर राहिल्याबद्दल प्रत्येकी २५ हजारांचा दंड ठोठावला होता.

चौकशी आयोगासमोर या प्रकरणातील विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी हजेरी लावली. ते म्हणाले, परमबीर सिंग यांनी सुरुवातीला मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राव्यतिरिक्त या प्रकरणात आणखी कोणतेही पुरावे देण्यास नकार दिला आहे. तसेच सिंग उलट तपासणीसाठीही तयार नसल्याचेही शिशिर हिरे यांनी सांगितले. यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गेल्या आठवड्यात नोंदवलेल्या खंडणीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दोन अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले होते. या वर्षी मार्चमध्ये मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवून होमगार्डमध्ये बदली झाल्यानंतर काही दिवसांनी सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात दावा केला होता की अनिल देशमुख पोलिस अधिकाऱ्यांना रेस्टॉरंट आणि बारमालकांकडून पैसे गोळा करण्यास सांगत असे. त्यांच्या या आरोपांनंतर अनिल देशमुख यांनी एप्रिलमध्ये गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, याच प्रकरणात सध्या अनिल देशमुख ईडीच्या कोठडीत आहेत.