सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ


नवी दिल्ली : काही सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रातील मोदी सरकारने पुन्हा एकदा दिवाळीची भेट दिली आहे. केंद्र सरकारच्या सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे.

वित्त मंत्रालयाच्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार 7 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्याचवेळी पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे केंद्रीय स्वायत्त संस्था पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 12 टक्क्यांनी वाढ करण्यात आली.

वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, 15 जुलै 2021 पासून ही वाढ प्रभावी मानली जाईल. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, ज्यांना पगार दिला जातो, तो मूळ वेतनाच्या 189 टक्क्यांवरून 196 टक्के करण्यात आला आहे. पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार पगारदार कर्मचाऱ्यांचा डीए 356 टक्क्यांवरून आता 368 टक्के करण्यात आला आहे. केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये वाढ करण्यात आल्याचा केंद्राच्या मेमोरँडममध्ये उल्लेख आहे.

विशेष म्हणजे मार्च 2020 मध्ये कोरोना आला, तेव्हा सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलत बंद केली होती, 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 पर्यंत ती थकवण्यात आली होती. 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीत 17 टक्के डीए आणि डीआर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अर्थ राज्यमंत्री म्हणाले होते. 1 जुलै 2021 पासून तीन हप्त्यांमध्ये वाढीव भत्ता जोडून हा लाभ देण्यात आला. हेच कारण आहे की, आता महागाई भत्ता आणि मदत एकत्रितपणे 11 टक्क्यांनी वाढून 28 टक्के झाली. यामध्ये 1 जानेवारी 2020 पासून 3 टक्के, 1 जुलै 2020 पासून 4 टक्के आणि 1 जानेवारी 2021 पासून 4 टक्के दरवाढ समाविष्ट आहे. अशा प्रकारे एकूण वाढ 11 टक्के वाढ करण्यात आली होती.

केंद्र सरकारने महागाई भत्त्यासंदर्भातील वाढीच्या घोषणेनंतर घरभाडे भत्त्या मध्ये 27 टक्के वाढ केली. वस्तुतः खर्च विभागाने 7 जुलै 2017 ला एक आदेश जारी केला होता, ज्यामध्ये असे म्हटले होते की जेव्हा महागाई भत्ता 25 टक्के ओलांडेल, तेव्हा घरभाडे भत्ता सुधारित केला जाणार आहे. 1 जुलैपासून महागाई भत्ता 28 टक्क्यांपर्यंत वाढला, त्यामुळे घरभाडे भत्ताही सुधारित करण्यात आला होता.