रविवारी आणखी एक खळबळजनक खुलासा करणार नवाब मलिक


मुंबई – सतत काही ना काही खुलासे करण्याचा सपाटाच सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लावलेला आहे. सूचक असे ट्विट करुन त्यानंतर काही वेळातच पत्रकार परिषद घेत ते नवनवे आरोप करत आहेत. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे त्यांचे लक्ष्य आहे. आर्यन खानवर झालेल्या कारवाईनंतर नवाब मलिक आणि वानखेडेंमध्ये चाललेला आरोप-प्रत्यारोपांचा खेळ नक्की कोणते वळण घेणार याकडे आता अवघ्या महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागलेले आहे. मलिकांनी आज आणखी एक सूचक ट्विट करत उत्सुकता वाढवली आहे.

आज ट्विट करत नवाब मलिकांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी एका नव्या खुलाशाचा सूचक इशाराही या ट्विटच्या माध्यमातून मधून दिला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “शुभ दीपावली. तुम्हा सर्वांची दिवाळी मंगलमय होवो. हॉटेल ललितमध्ये अनेक रहस्य लपलेली आहेत. तेव्हा भेटूया रविवारी. त्यांच्या या ट्विटची आता चांगलीच चर्चा रंगत आहे.

नवाब मलिक रविवारी कोणता नवा खुलासा करणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. दरम्यान राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज आणखी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी, लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे, असे म्हटले आहे.

हे ट्विट नवाब मलिक यांनी केल्यानंतर काही वेळातच यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. तसेच अनेकजण हे ट्विट लाईक आणि रिट्विट देखील करत आहे. या ट्विटवर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये जशा नवाब मलिक यांच्या कौतुकाच्या प्रतिक्रिया आहेत, तशाच त्यांच्यावर टीका करणाऱ्या देखील आहेत. दरम्यान, नवाब मलिक यांनी आपल्या आधीच्या पत्रकार परिषदांमध्ये बोलताना भाजपच्या अनेक नेत्यांचा खरा चेहरा समोर आणणार असल्याचा इशारा दिला आहे. यात त्यांनी प्रतिक गाबापासून अनेकांचा उल्लेख केला आहे. तसेच आगामी विधानसभा अधिवेशनात सदनाच्या पटलावर या सर्वांवरील आरोपांबाबतचे पुरावे ठेवणार असल्याचे म्हटले.