शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून समीर वानखेडेंच्या समर्थनात आंदोलन


मुंबई : सध्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एकूणच महाविकास आघाडीच्या रडारवर एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे आहेत. पण समीर वानखेडेंच्या समर्थनात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान मैदानात उतरली आहे. एनसीबीच्या मुंबई कार्यालयाबाहेर आज समीर वानखेडेंचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली.

एकापाठोपाठ एक आरोप समीर वानखेडेंवर होत असताना त्यांच्या समर्थनात आता आंदोलने होऊ लागली आहेत. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संघटनेतर्फे बुधवारी सकाळी समीर वानखेडेंच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, नेमक्या त्याचवेळी कार्यालयात दाखल होणाऱ्या समीर वानखेडेंवर पुष्पवृष्टी करत त्यांना छत्रपती शिवरयांची एक प्रतिमा भेट देण्यात आली. समीर वानखेडेंनी या सर्व गोष्टींचा स्विकार केला, पण कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. यासंदर्भातील वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

एबीपी माझाशी बोलताना श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष नितीन चौगुले म्हणाले की, केवळ एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नवाब मलिक हे बदनामी करत आहेत. ड्रग्जच्या व्यवसायाला पाठीशी घालणाऱ्या मलिकांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. नवाब मलिकांविरोधात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान ही संघटना यापुढेही अशीच आंदोलने करत राहील.