फटाके बंदीच्या मुद्द्यावर कंगना राणावतने व्यक्त केला संताप


दिवाळीचा सण म्हटले की मिठाई, रोषणाई आणि आतषबाजी ही आली. पण गेल्या कित्येक वर्षापासून वाढणारे प्रदूषण यामुळे बऱ्याच राज्यात फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली. तर दुसरीकडे कोरोना आजारामुळे गेल्या दीड वर्षांपासून फटाके किंवा आतिषबाजी करण्यावर आणखी निर्बंध आले होते. दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही वाढत्या वायू प्रदूषणामुळे दिल्लीसह अनेक राज्यात फटाके फोडण्यावर बंदी घातली आहे. अनेकजण फटाके बंदीच्या या निर्णयाचे समर्थन देत आहेत, तर काहींनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने या मुद्द्यावर संताप व्यक्त केला आहे.

अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव सदगुरु यांची कंगना राणावत ही अनुयायी असल्याचे म्हटले जाते. तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर नुकतेच जग्गी वासुदेव सदगुरु यांचा एका व्हिडीओ शेअर केला होता. यात सदगुरु हे त्यांच्या लहानपणी फटाके फोडण्याचे अनेक आठवणी, त्यातील किस्से सांगताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ शेअर करत तिने दिवाळीतील फटाक्यांवरील बंदीचे समर्थन करणाऱ्यांवर टीका केली.

फटाके बंदीचे ज्या लोकांनी समर्थन केले आहे, त्यांनी फटाक्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी ३ दिवस गाडीचा वापर करणे बंद करावे, अशी संतप्त प्रतिक्रिया कंगनाने दिली आहे. सर्व पर्यावरण कार्यकर्त्यांसाठी दिवाळीदरम्यान योग्य उत्तर म्हणजे पुढील ३ दिवस तुमची गाडी न वापरता पायी चालत ऑफिसला जा, असा सल्ला तिने फटाके बंदीबाबत बोलताना दिला आहे. यावेळी ती म्हणाली की, अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव सदगुरु हे अशी व्यक्ती आहेत, ज्यांनी लाखो झाडे लावत जगात हिरवळ वाढवण्याचा जागतिक विक्रम केला आहे. दरम्यान कंगनाच्या या संतप्त प्रतिक्रियेनंतर बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूर हिने फटाके बंदीच्या निर्णयाला समर्थन दिले आहे. तसेच दिवाळीत फटाके फोडू नका, असे आवाहनही तिने लोकांना केले आहे.