खळबळजनक वक्तव्यामुळे इंदुरीकर महाराज पुन्हा चर्चेत


नाशिक – कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी एक वक्तव्य केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मी कोरोना लस घेतली नाही आणि घेणार नसल्याचे वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील एका कार्यक्रमात केले आहे. घोटी कृषी उत्पन बाजार समितीत गोपाळरावजी गुळवे यांच्या ८१व्या जयंतीनिमित्ताने शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५०० पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमाला स्थानिक महाविकास आघाडीचे नेते देखील उपस्थित होते.

ज्याची त्याची प्रतिकार शक्ती वेगळी आहे, हे कळायला नको का. प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता देखील वेगळी आहे. मी सगळीकडे फिरतो. मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही, तर घेऊन करायचे काय? कोरोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. १४ वर्षे राम वनवासाला गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. तिथे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला, तर सीतेने डोकावून पाहिले नसल्याचे इंदुरीकर महाराज यांनी म्हटले आहे.

कोरोनाकाळात गेल्या वर्षी महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मदत करण्याचे आवाहन केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत अहमदनगरचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर यांनी एक लाखांची मदत दिली होती. लॉकडाउनमुळे रोज हातावर पोट असणाऱ्या संगमनेर तालुक्यातील कुटुंबाची होणारी संभाव्य उपासमार टाळण्यासाठी इंदुरीकर महाराजांनी ओझर, रहिमपूर, कोकणगाव, वडगापान येथील काही गरीब कुटुंबाना धान्याचे वाटप केले होते.