उत्तरप्रदेशात एकाच वेळी आढळले १४ झिकाबाधित


कानपूर – झिका विषाणूची लागण झालेले १४ रुग्ण उत्तरप्रदेशातल्या कानपूरमध्ये एकाच वेळी आढळून आले आहेत. एका गर्भवती महिलेचाही या १४ जणांमध्ये समावेश आहे. आता शहरातील झिका विषाणूने बाधित झालेल्यांची संख्या २५ वर पोहोचली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाचवेळी रुग्ण मिळाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

सध्या कानपूरमध्ये झिका विषाणूचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. या आधी १ नोव्हेंबरला ६ रुग्ण आढळून आले होते. कानपूर शहरातल्या चकेरी भागात हे रुग्ण आढळून आले आहेत. एडीज एजिप्टी प्रजातीच्या डासामुळे झिका हा विषाणू पसरतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, एडीज डास दिवसा चावतात. याच डासांमुळे डेंग्यू आणि चिकन गुनियाचाही प्रसार होतो. झिका हा सर्वसाधारणपणे जीवघेणा विषाणू नाही, पण गर्भवतींसाठी तसेच भ्रूणासाठी हा विषाणू धोकादायक ठरू शकतो.

डेंग्यूसारखीच झिका विषाणूची अनेक लक्षणे ही असतात. पण डेंग्यूपेक्षा हा विषाणू अधिक धोकादायक आणि जीवघेणा ठरु शकतो. झिका विषाणूची वाढती रुग्णसंख्या पाहून प्रशासन आता सज्ज झाले आहे. रुग्णांचा इलाज काशीराम रुग्णालयात केला जात आहे. तिथे झिकाबाधित रुग्णांसाठी वेगळा वॉर्ड तयार करण्यात आला आहे. याशिवाय झिकाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन अनेक महत्त्वाची पावले उचलत आहे.