अफगाणिस्तानात सत्तास्थापनेनंतर झाली तालिबानी वरिष्ठ नेत्याची हत्या


काबुल – तालिबानच्या एका वरिष्ठ कमांडरची अफगाणिस्तानमध्ये हत्या झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदाच तालिबानच्या एवढ्या वरिष्ठ नेत्याचा मृत्यू झाला आहे. या तालिबानी कमांडरचे हमदुल्लाह मुखलीस असे नाव आहे. काबुलमधील रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात मुखलीसचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी इसिसने घेतली आहे.

कट्टरतावादी संघटना हक्कानी नेटवर्कचा हमदुल्लाह मुखलीस सदस्य होता. सध्या बादरी स्पेशल फोर्सेसमध्ये त्याची नियुक्ती करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार, तालिबानने काबुलवर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदा तालिबानच्या एवढ्या वरिष्ठ नेत्याची हत्या झाली आहे.

सरदार मोहम्मद दाऊद खान सैन्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी (२ नोव्हेबर) २ बॉम्बहल्ले करण्यात आले. त्यानंतर बेछूट गोळीबारही करण्यात आला. याला प्रत्युत्तर देताना तालिबानचा कमांडर हमदुल्लाह मुखलीस यांचा मृत्यू झाला. इसिस या कट्टरतवादी संघटनेने राजधानी काबुलमध्ये केलेल्या गोळीबार आणि बॉम्ब हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. इस्लामिक स्टेटने (खोरसन) म्हटले की इस्लामिक स्टेटच्या ५ लढाऊंनी हा हल्ला केला. दुसरीकडे तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिदने इसिसवर रुग्णालयातील नागरिक, डॉक्टर, रुग्णांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. तसेच या हल्ल्यानंतर तालिबानच्या लडाऊंनी केवळ १५ मिनिटातच प्रत्युत्तर दिल्याचा दावा मुजाहिदने केला आहे.

हल्ल्यानंतर तालिबानने अमेरिकेच्या सैन्य छावणीत मिळालेल्या हेलिकॉप्टरचा उपयोग करून तातडीने रुग्णालयाच्या ठिकाणी विशेष दलाला उतरवले. त्याचवेळी एका आत्मघातकी बॉम्बरने रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वतःला स्फोटकांनी उडवले. त्यानंतर इतरांनी रुग्णालयात गोळीबार केला, अशी माहिती तालिबानने दिली.