या गावात योगीबाबाच्या शिवाय साजरी होत नाही दिवाळी

गोरखपूरच्या कुसम्ही जंगलातील वनटांगिया, जंगल तीकोनिया नंबर ३ हे असे एक गाव आहे जेथे दिवाळी निमित्त तेवणारा प्रत्येक दिवा योगीबाबा यांच्या नावाने तेवत असतो. गेले १५ वर्षे ही परंपरा येथे रुळली असून गावातील वयोवृद्ध सुद्धा लहान मुलांप्रमाणे एक हट्ट करतात. बाबा नाही तर दिवाळीचे दिवे तेवणार नाहीत असा हा हट्ट असतो. योगी बाबा म्हणजे दुसरे तिसरे कुणी नाही तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गोरक्षपीठाचे उत्तराधिकारी योगी आदित्यनाथ हे आहेत.

सुमारे १५ वर्षापूर्वी गोरक्षपीठ उत्तराधिकारी योगी आदित्यनाथ प्रथम खासदार बनले आणि त्यांनी वनटांगीया गावातील रहिवाश्याच्या सोबत दिवाळी साजरी करण्याची प्रथा सुरु केली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा ही परंपरा सुरु आहे. योगी दिवाळीची सुरवात या वस्तीपासून करतात. यंदाही हे रहिवासी योगी यांची प्रतीक्षा करत आहेत.

ब्रिटीश शासन काळात रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरु झाले तेव्हा रेल्वेरुळाच्या मध्ये लागणारे लाकडी स्लीपर्स या जंगलातील साखू झाडापासून बनविले जात होते. वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत असल्याने नवीन रोपे लावण्यासाठी येथे भूमिहीन, मजुरांना आणून वसाहत केली गेली. या भागात अश्या ५ वस्त्या आहेत. स्वातंत्र्यानंतर सुद्धा येथील परिस्थिती बदललेली नव्हती. या लोकांना नागरिकत्व नव्हते त्यामुळे कुठल्याही सुविधा नव्हत्या. झोपडीशिवाय अन्य काही बांधकाम करण्याची परवानगी नव्हती.

१९९८ मध्ये योगी आदित्यनाथ प्रथम येथे खासदार म्हणून आले तेव्हा या भागात नक्षलवादी हातपाय पसरण्याची तयारी करत असल्याचे त्यांना कळले. तेव्हाच त्यांनी या भागात प्रथम शिक्षण आणि आरोग्यसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. २००३ मध्ये काम सुरु झाले आणि २००७ मध्ये त्याला मूर्तस्वरूप आले. येथे शाळा बांधताना आदित्यनाथ यांच्या विरुध्द वनजमिनीवर बांधकाम केले म्हणून पोलीस केस दाखल झाली होती. २००९ मध्ये योगी आदित्यनाथ यांनी प्रथमच येथे दिवाळी साजरी केली आणि मिठाई, पुस्तके, फटाके वाटून गावाला महसुली दर्जा दिला. त्यामुळे पंचायत निवडणुका होऊ शकल्या आणि आज या गावात पक्की घरे, रोजगार, शाळा, गॅस जोडणी, शेतजमीन, वीज, शौचालये अश्या सुविधा आहेत. त्यामुळे या गावातील रहिवासी योगीना रामाचा अवतार मानतात आणि त्याच्याशिवाय दिवाळी साजरी करत नाहीत.