यंदा १२ खेळरत्न आणि ३० अर्जुन पुरस्कार दिले जाणार

ऑलिम्पिक मधील कांस्य पदक विजेत्या हॉकी टीमचा कप्तान मनप्रीतसिंग याला मंगळवारी मेजर ध्यानचंद  खेळरत्न पुरस्कार यादीत सामील केले गेल्याची घोषणा केली गेली आहे. त्यामुळे देशातील या सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी निवड झालेल्या खेळाडूंची संख्या १२ वर गेली आहे. त्याचबरोबर अर्जुन पुरस्काराने ३० खेळाडूना सन्मानित करण्यात येत असून १३ नोव्हेंबरला राष्ट्रपती भवनात एका कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हॉकी कप्तान मनप्रीत याची शिफारस प्रथम अर्जुन पुरस्कारासाठी केली गेली होती पण आता त्याचे नाव खेळरत्न साठी जाहीर केले गेले आहे. यामुळे गोलकीपर पी.आर. श्रीजेष बरोबर तो हा पुरस्कार मिळविणारा दुसरा हॉकी खेळाडू बनला आहे. या बरोबरच नीरज चोप्रा, पहिलवान रवी दहिया, महिला क्रिकेटर मिताली राज यानाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मुष्टीपटू लावलीना बोरगोहेन, पॅरा शुटींग अवनी लेखरा, पॅरा अॅथलीट सुमित अन्तील, प्रमोद भगत, कृष्णा नागर, मनीष नरवाल यानाही या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. फुटबॉल पटू सुनिल छेत्री आणि क्रिकेटर शिखर धवन यांचाही यात समावेश आहे.