इस्रायल पंतप्रधानांची मोदींना त्यांच्या पक्षात येण्याची खुली ऑफर

मंगळवारी सीओपी २६ जलवायू शिखर परिषदेत इस्रायलचे पंतप्रधान नाफ्ताली बेनेट आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली. इस्रायलचे पंतप्रधान नाफ्ताली बेनेट यांनी यावेळी मजेत बोलताना मोदींना ‘ तुम्ही आमच्या देशात खूपच लोकप्रिय आहात . आमच्या यामिना पक्षात सामील व्हा’ अशी खुली ऑफर दिली. यावेळी मोदींनी भारतीय इस्रायलबरोबरच्या मैत्रीला फार महत्व देतात आणि उभय देशातील संबंध मजबूत व प्रगाढ होण्यासाठी काम करण्यास प्रतिबद्ध असल्याचे ट्वीट केले. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या मध्ये झालेली ही पहिलीच औपचारिक भेट होती.

दोन्ही बाजूनी या संदर्भातील व्हिडीओ शेअर केले गेले असून त्यात दोन्ही नेते जोशपूर्ण चर्चा करताना एकमेकांना अभिवादन करताना दिसत आहेत. बेनेट यांनी मोदींना ‘तुमच्या भेटीने खूप चांगले वाटले’ असे आवर्जून सांगितले आहे. तर मोदींनी बेनेट यांना भारत दौर्यावर येण्याचे आमंत्रण दिले आहे. त्यामुळे बेनेट लवकरच भारताच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. पुढील वर्षात भारत इस्रायल राजनीतिक संबंध सुरु झाल्याचा ३० वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित बेनेट भारताला भेट देतील असे सांगितले जात आहे.

मंगळवारी रात्री भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सीओपी २६ जलवायू परिषद संपवून मायदेशी रवाना झाले. स्कॉटलंडच्या ग्लासगो विमानतळावर मोदींना निरोप देण्यासाठी भारतीय समुदायाने प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी ढोल ताशे वाजविले गेले आणि मोदी यांनाही ढोलावर थाप मारण्याचा मोह आवरता आला नाही.