लदाखच्या चीन सीमावर्ती डेमचोकमध्ये प्रथमच वाजली मोबाईल रिंग
चीनच्या सीमेला लागून असलेल्या लडाखच्या दुर्गम सीमावर्ती भागातील एक गाव डेमचोक येथे प्रथमच मोबाईलची रिंग वाजू लागली आहे. रिलायंस जिओने ही अवघड कामगिरी पार पडली असून या भागातील नव्या मोबाईल टॉवरचे उद्घाटन मंगळवारी लेहचे खासदार जम्यांग त्सेरिंग नामग्याल यांच्या हस्ते करण्यात आले. या भागात यामुळे फोर जी कनेक्शन सुरु झाले असून दशकानुदशकाची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. या भागातील भारतीय प्रथमच फोर जी व्हॉईस व डेटा मोबाईल नेटवर्कची जोडले गेले आहेत.
खासदार नामग्याल यांनी रिलायंस जिओ अधिकाऱ्यांना हे अवघड काम वेळेत पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद दिले असून या भागातील रहिवासी, सेना आणि आयटीबीपी जवान तसेच प्रवाशांना हे नेटवर्क समर्पित केले आहे. हे नेटवर्क या भागात मैलाचा दगड ठरेल असे सांगून न्यामगल म्हणाले, येथे बर्फ खूप पडते आणि हवा खराब असते. त्यामुळे वर्षातील ६ ते ७ महिनेच काम करता येते. हे आव्हान पेलून रिलायंसने काम वेळेत पूर्ण केले आहे.
डेमचोक बरोबर लदाख सीमा भागातील चुशुल, न्योमा, थारूक व दुर्बुक येथेही फोर जी सेवा सुरु झाली आहे. लदाख भागात रिलायन्सचे १६८ टॉवर्स उभे राहणार असून सियाचीन बेस कॅम्प व झांस्कर भागात जिओ हे एकमेव नेटवर्क ऑपरेटर आहेत. दुर्गम भागात व अन्य गावात नेटवर्क विस्तार करण्यासाठी रिलायंसला सरकारी युएसओएफ अंतर्गत ६२ टॉवर्स उभारण्याची जबाबदारी दिली गेली असून त्यातील ४४ टॉवर्स सुरु झाले आहेत. जिओने या भागात कोणत्याही परिस्थितीमध्ये नेटवर्क सुरु राहावे यासाठी तीन फायबर रुट्स टाकले आहेत. लेह श्रीनगर, लेह मनाली आणि लेह गुरेत असे हे मार्ग आहेत.
हे नेटवर्क या भागात राहणाऱ्या समुदायांना वरदान ठरणार असून त्यामुळे स्वास्थ्य, शिक्षण क्षेत्रात परिवर्तन होऊ शकेल तसेच आर्थिक विकासासाठी ते उपयुक्त ठरेल असे सांगितले जात आहे. या नेटवर्क मुळे या भागातील युवक आणि व्यापाऱ्यांना कमाईच्या संधी मिळतील असेही सांगितले जात आहे.