लखनौच्या खास मिठाईची यंदा जोरदार चर्चा, ५० हजार रुपये किलो दर

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ मध्ये दिवाळी निम्मित एका खास मिठाईची खास चर्चा असून स्वाद आणि किंमत दोन्ही दृष्टीने ही मिठाई लाजवाब आहे. अर्थात कुणीही चटकन ही मिठाई खरेदी करण्याचा विचार करू शकत नाही तरीही लखनौ बरोबरच अन्य शहरातील तसेच विदेशातील ग्राहक सुद्धा तिचे बुकिंग मोठ्या प्रमाणावर करत  आहेत. या मिठाईच्या एका तुकड्याची किंमत ५०० रुपये असून किलोचा भाव आहे ५० हजार रुपये. इतकी महाग असूनही या मिठाईच्या खरेदीसाठी ग्राहक क्रेझी आहेत.

एक्झोटीका २४ कॅरेट गोल्ड प्लेटेड असे तिचे नाव असून त्यात वापरले गेलेले साहित्य विविध ठिकाणाहून आणले गेले आहे. यात किन्नोरचे चील्गोजे, काश्मिरी केशर, युएसएच्या ब्लू बेरी, द. आफ्रिकेचे मकदामिया, ऑस्ट्रेलियातील हेजल नट वापरले गेले आहेत. विशेष म्हणजे ही मिठाई २००७ मध्ये प्रथम बनविली गेली होती. आज लखनौ येथील प्रसिद्ध छप्पन भोग या एकमेव दुकानात ती वर्षभर उपलब्ध असते. ही मिठाई २० ते ३० दिवस टिकते.

दुकानाचे मालक रविंद्र गुप्ता यांच्या खास प्रयत्नातून ही खास मिठाई प्रथम तयार केली गेली. दिवाळी मध्ये तिला अधिक मागणी असून तिचे पॅकिंग सुद्धा शाही आहे. शुद्ध २४ कॅरेट, खाता येणाऱ्या सोन्याच्या वर्खात लपेटलेले मिठाईचे २.५ सेंटीमीटर आकाराचे तुकडे शाही लाकडी पेटीत ठेऊन विकले जात आहेत. रवींद्र गुप्ता सांगतात, अनेक सेलेब्रिटीनी या मिठाईची चव घेतली आहे. बच्चन कुटुंबापासून शत्रुघ्न सिंन्हा पर्यंत अनेकांचा त्यात समावेश आहे. इतकेच नव्हे तर पंतप्रधान मोदी गुजराथचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सुद्धा ही मिठाई चाखली आहे.