धनत्रयोदशीला महाराष्ट्रात १५०० कोटींची सोने चांदी विक्री

करोना मुळे गेली दोन वर्षे मंदी झेलत असलेल्या सराफी बाजारात यंदाच्या धनत्रयोदशी दिवशी आनंद फुललेला पाहायला मिळाला आहे. मंगळवारी देशभरातील सराफ बाजारात सोने चांदीची जोरदार विक्री झाली असून या एका दिवसात ७५०० कोटींची सोने चांदी विक्री झाल्याचे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स तर्फे जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे करोना पूर्वी म्हणजे २०१९ पेक्षा सुद्धा यंदा हे दोन्ही धातू जास्त प्रमाणात विकले गेल्याचे सांगितले जात आहे. या एका दिवसात १५ टन सोन्याचे दागिने विक्री झाली आहे. पैकी महाराष्ट्रात या एका दिवसात १५०० कोटींची खरेदी ग्राहकांनी केली आहे.

करोना काळात म्हणजे २०२० मध्ये धनत्रयोदशी दिवशी ३५०० ते ४ हजार कोटींची विक्री झाली होती तर २०१९ मध्ये हीच विक्री ४५०० कोटींवर होती. यंदा दक्षिण भारतात २ हजार कोटी, महाराष्ट्रात १५०० कोटी, दिल्ली, प.बंगाल मध्ये १ हजार कोटी, उत्तर प्रदेश ६०० कोटी, हरियाना २५० कोटी असे हे प्रमाण आहे. ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश सिंघल म्हणाले यंदा चांगल्या विक्रीची अपेक्षा होती आणि सराफांनी त्यासाठी जोरदार तयारी केली होती. त्यात अधिक भर हॉलमार्कसह दागिन्यांच्या डिझाईनवर दिला गेला होता. छोट्या अंगठीपासून नेकलेस, बांगड्या, कर्णफुले शिवाय सोन्याच्या लडी विविध प्रकारात आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध केल्या गेल्या होत्या.

अखिल भारतीय रत्न व दागिने समितीचे अध्यक्ष आशिष पेठे म्हणाले, गेली दोन वर्षे करोनाच्या भीतीमुळे ग्राहक घराबाहेर पडलेले नव्हते. त्यामुळे सण उत्साहात साजरे झाले नाहीत. अनेक बंधने होती. आता करोना परिस्थिती सुधारली आहे आणि लसीकरण बर्यापैकी झाल्याने लोकांची भीती कमी झाली आहे. परिणामी यंदा सोने चांदी खरेदीवर फारश्या ऑफर्स नसूनही ग्राहकांनी मोकळ्या हाताने खर्च करण्यावर भर दिला असे दिसून येत आहे. यंदा २०१९ च्या तुलनेत सोन्याचे भाव कमी आहेत पण चांदी मात्र वाढली आहे.