झुकेरबर्गच्या राजीनाम्याची फेसबुकच्या माजी महिला कर्मचाऱ्याने केली मागणी


लिसबॉन – आपला माजी बॉस आणि फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गला कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरुन पायउतार होण्याचा सल्ला पूर्वाश्रमीच्या फेसबुकच्या उत्पादन व्यवस्थापक असलेल्या फ्रान्सेस हॉगेन या महिला कर्मचाऱ्याने दिला आहे. कंपनीचे अनेक गोष्टी वापरुन रिब्रॅण्डींग करण्याऐवजी मार्कने पदाचा राजीनामा द्यावा, असे हॉगेनने म्हटले आहे. फेसबुकने चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे वापरुन माहितीचा वापर केल्याच्या धक्कादायक दावा हॉगेनने काही आठवड्यांपूर्वी केला होता. फेसबुकमधील कामाकाजाबद्दल बोलणारी जागल्या म्हणजेच व्हिसल ब्लोअर म्हणून सध्या अमेरिकेत फार चर्चेत आहेत. फेसबुकमधील कार्यपद्धतीबद्दल धक्कादायक दावे करणारी हॉगेन तिने केलेल्या आरोपांनंतर पहिल्यांदाच सार्वजनिक मंचावरुन जगासमोर आली.

जर मार्क झुकेरबर्गच सीईओ राहिला, तर कंपनीमध्ये बदल होणार नसल्याचे मला वाटते, असे हॉगेन म्हणाली आहे. ती पोर्तुगालची राजधानी लिसबॉन येथे आयोजित केलेल्या वेब परिषदेच्या पहिल्याच दिवशी बोलत होती. मार्कने राजीनामा द्यावा का असा प्रश्न विचारण्यात आला असताना हॉगेनने सकारात्मक उत्तर दिले. कदाचित ही एखाद्या वेगळ्या व्यक्तीने फेसबुकचे नेतृत्व करण्याची संधी असल्यासारखे असेल. मला वाटते मार्कऐवजी सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या एखाद्या व्यक्तीने नेतृत्व करावे, असे हॉगेन म्हणाल्याचं रॉयटर्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

अनेकांना एकमेकांशी जोडत समाज बांधणी करत असल्याचे फेसबुकचे ‘दाखवायचे दात’ असून त्यांचे ‘खायचे दात’ हे प्रत्यक्षात केवळ कंपनीला मिळणाऱ्या नफ्याशीच संबंधित आहेत. ‘नफा की, समाजाचे हित’ अशी निवडीची वेळ आली की, दर खेपेस निवड पण नफ्याचीच होते. परिणामी असामाजिक बाबी वारंवार डोके वर काढतात. एकूणच हे सारे समाजासाठी घातक असल्याचे पहिल्यांदा फेसबुकविरोधी भूमिका घेताना ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातील हॉगेनने म्हटले होते. तिने नंतर अमेरिकन काँग्रेससमोरही आपले म्हणणे मांडले. तत्पूर्वी ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ आणि अमेरिकन सरकारी यंत्रणांनाही तिने भरपूर दस्तावेज सादर केले.